Zee Marathi Tarini Serial Promo : ‘तारिणी’ मालिकेत काही दिवसांपूर्वीच केदार अन् तारिणीला ‘JPC मेडिकल स्कॅम’ घोटाळ्यासंदर्भात महत्त्वाची माहिती मिळाल्याचं आपण पाहिलं. या दोघांनी खांडेकरांच्या घरात बरीच शोधाशोध केली. यादरम्यान केदारला एक महत्त्वाचा पुरावा सापडतो. केदारची आई हयात नसते, तिचे काही जुने रिपोर्ट्स त्याला सापडतात. आपली आई भेसळयुक्त औषधं घेत असल्याचं त्याच्यासमोर स्पष्ट झालं आहे.
तारिणीला सुद्धा हे रिपोर्ट्स पाहून धक्का बसतो. पण, या दोघांसमोर एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे केदारची आई आणि तारिणीची आई या दोघींचा गुन्हेगार एकच आहे. आता हा गुन्हेगार नेमका कोण आहे? याचा शोध या दोघांना घ्यायचा आहे.
तारिणी मालिकेतील मुख्य व्हिलन आतापर्यंत युवराज होता. पण, आता मेडिकल स्कॅममध्ये युवराज सोडून एक वेगळाच गुन्हेगार प्रेक्षकांसमोर येणार आहे. स्टोअर रूम दयानंद खांडेकर या JPC मेडिकल स्कॅमच्या कॅसेट्स शोधत असतात. याशिवाय या शोधकार्यात आणखी एका व्यक्तीचं नाव समोर येणार आहे तो म्हणजे जयराम…केदारच्या आईचा मानलेला भाऊ. या जयरामकडे महत्त्वाची माहिती असल्याने त्याने पटकन ताब्यात घेण्यासाठी तारिणी अन् तिची टीम पोहोचते.
तारिणीला बसणार धक्का
पण, समोर काहीतरी वेगळंच घडलेलं असतं. जयरामने आधीच दयानंद खांडेकरांना भेटायला बोलावून घेतलेलं असतं. ज्यावेळी ‘तारिणी’ टीमसह जयरामकडे पोहोचते तेव्हा समोर तिला जयरामची डेड बॉडी दिसते. इतकंच नव्हे तर याच्या अगदी बाजूला रक्ताने माखलेले हात घेऊन दयानंद खांडेकर उभे असतात. आपल्या सासऱ्यांना या अवस्थेत पाहून तारिणीला धक्का बसतो. “बाबा….” हा एकच शब्द बोलून ती नि:शब्द होते.
आता खरंच दयानंदने जयरामचा खून केला असेल का? की यामागचा सूत्रधार कुणी वेगळाच आहे याचा उलगडा ६ आणि ७ एप्रिलच्या भागात होईल.
तारिणी मालिकेच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी सुद्धा असंख्य कमेंट्स केल्या आहेत. “आम्हाला वाटतंय ज्याने कुणी जयरामचा खून केलाय…तो वेगळाच कोणीतरी आहे”, “खुनाचा आणि दयानंदचा संबंध नाही”, “मुख्य व्हिलन दयानंद नसणारच”, “कोणीतरी वेगळाच खुनी आहे दयानंद नक्कीच नाही”, “आता हातात चाकू पाहून दयानंदवर संशय जाईल पण त्याने काहीच केलेलं नाहीये”, “इतक्या लवकर सत्य बाहेर येणार नाही…पण, यामागे दयानंद सुद्धा नाहीये” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.
