Zee Marathi Tarini Serial News : ‘तारिणी’ मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत अधिराज्य गाजवताना दिसतेय. ‘झी मराठी’वर सध्या ही मालिका नंबर वन आहे. यामुळेच तारिणीबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तारिणी मालिका येत्या सोमवारपासून म्हणजेच १३ एप्रिलपासून दररोज ४५ मिनिटं प्रसारित केली जाईल. रात्री ९:३० ते १०:१५ ही ‘तारिणी’ची नवीन वेळ आहे. आता मालिकेत नेमकं काय घडणार? जाणून घेऊयात…
दयानंद खांडेकरांना काही दिवसांपूर्वीच जयरामच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हा जयराम केदारच्या आईचा मानलेला भाऊ असतो. जयरामने दयानंद खांडेकरांना स्वत: फोन करून बोलावून घेतलं होतं. यानंतर जयरामचा खून होतो. तारिणी जेव्हा घटनास्थळी पोहोचते तेव्हा तिला दयानंद खांडेकरांचे हात रक्ताने माखलेले दिसतात. अर्थात, तारिणीने दिलेल्या साक्षीनुसार खांडेकरांना अटक केली जाते. पण, आपले सासरे निर्दोष आहेत याची पूर्ण खात्री तारिणीला असते.
याउलट केदारला दयानंद खांडेकरांवर अजिबात विश्वास नसतो. या गुन्ह्यात आपलेच वडील दोषी असू शकतात असा गैरसमज तो करून घेतो. आता केदारचा हाच गैरसमज दूर करण्याचं काम तारिणी करणार आहे.
तारिणी दयानंद खांडेकरांना जेलमध्ये जाऊन भेटते. यावेळी ते प्रचंड हतबल झालेले असतात. आपला मुलगा आता कायमचा आपल्यापासून दुरावणार अशी खंत त्यांच्या मनात असते. त्यामुळेच ते तारिणीसमोर हात जोडतात. तिलाही आपले सासरे निर्दोष असणार याबद्दल शंभर टक्के खात्री असते. अशातच तारिणीच्या हाती एक मोठा पुरावा लागणार आहे.
तारिणीला जयरामचा मोबाइल फोन सापडणार आहे. याच फोनवरून जयरामचं दयानंद खांडेकरांबरोबर शेवटचं बोलणं झालेलं असतं. या फोनमुळे बाबा निर्दोष सुटतील असा विश्वास ती केदारसमोर व्यक्त करते. यावर केदार तिला म्हणतो, “तुझा हा विश्वास कोणत्याही नव्या संकटाची चाहूल नसावी” पुढे तारिणी म्हणते, “नाही…कदाचित ही तुमच्यातील नव्या नात्याची सुरुवातही असू शकते”
आता जयरामच्या फोनमध्ये तारिणीला काय सापडणार? यामुळे दयानंद खांडेकर निर्दोष मुक्त होतील का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे केदार आणि दयानंद या दोन्ही बापलेकाचं नातं कोणतं वळण घेणार हे मालिकेत पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
