Tarini Upcoming Twist: ‘तारिणी’ या मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट येताना दिसतात. काही दिवसांपूर्वी एक मिशन पूर्ण करण्यासाठी आणि काही गोष्टींचा शोध लावण्यासाठी तारिणी आणि केदार खांडेकरांच्या घरात राहायला गेले. त्यावेळी त्यांनी त्यांचे लग्न झाले आहे, असे सांगितले.

एका जोडप्याप्रमाणे ते राहत होते. मात्र, त्यांचे लग्न झाले नसल्याचे सत्य निशीला समजले. त्यावेळी त्यांच्या लग्नाचे सत्य बाहेर यावे, यासाठी निशीने कौशिकीला त्यांचे पुन्हा लग्न लावून द्यावे, असे सुचवले.

जेव्हा कौशिकीने सर्वांच्या साक्षीने तुमचे लग्न पुन्हा करण्याचा विचार आहे, असे सांगितले तेव्हा तारिणी आणि केदारने त्यावर एक उपाय शोधून काढला. त्यांनी कौशिकीसमोर भांडण्याचे नाटक केले. तारिणी खांडेकरांचे घर सोडून तिच्या माहेरी निघून गेली. मात्र, या सगळ्यात त्यांचे मिशन पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे तारिणी आणि केदार स्पेशल क्राइम युनिटचे भाग आहेत. आता त्यांच्या हाती काही पुरावे लागल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहेत.

तारिणीला मिळणार पुरावा

झी मराठी वाहिनीने मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की तारिणी तिच्या आत्याला कामात मदत करत आहे. तिची आत्या एका कपाटावरुन काही पेपर खाली काढते. तारिणी तिला विचारते की एवढी जुनी रद्दी का सांभाळून ठेवली आहे? त्यावर आत्या म्हणते की ती रद्दी नाही. कामाचे कागद आहेत. तारिणी जेव्हा ते पेपर बघते, तेव्हा ते मेडिकल कॉलेजचे पेपर असल्याचे कळते. ती ते पेपर स्वत:जवळ लपवून ठेवते. ती केदारला फोन करून सांगते की तुला लोकेशन पाठवते. तिथे पोहोच.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की निशी तिच्या आत्याला फोन करुन सांगते, “केदार-तारिणीचं हे सगळं नाटक आहे. ती कुठे जाते, कोणाला भेटते यावर नीट लक्ष ठेव.”

निशीच्या बोलण्यानुसार तिची आत्या तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तारिणीच्या मागे जाते. एका ठिकाणी तारिणी आणि केदार भेटले असून ते एकमेकांशी बोलत असल्याचे दिसते. तिथेच आत्या आणि तिची मुलगी येतात. केदार आणि तारिणीदेखील एकमेकांकडे बघतात.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “तारिणी-केदारवर लक्ष ठेवून त्यांच्या नात्याच्या खरेखोटेपणा निशी सर्वांसमोर आणणार”, अशी कॅप्शन दिली आहे.

नेटकरी म्हणाले…

हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. “तारिणी आणि केदारच्या लग्नासाठी उत्सुक आहे”, “तारिणी खरंच उत्तम मालिका आहे”, “तारिणी केदार ला आता खरंच लग्न करावं लागणार वाटतं, “निशीला धडा शिकवा”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, आता मालिकेत नेमकं काय घडणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.