Zee Marathi Tarini Serial : ‘तारिणी’ मालिकेला नुकतंच १ वर्ष पूर्ण झालं. आता येत्या १५ ऑगस्टपासून मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. आतापर्यंत तारिणीने एक अंडरकव्हर कॉप म्हणून अनेक कठीण प्रकरणांचा तपास करत सत्य समोर आणलं आहे. सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी तिने अनेकदा स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि न्यायासाठी ठामपणे लढा दिला. आता तिच्यासमोर यापेक्षाही मोठी जबाबदारी येणार आहे. देशाच्या सुरक्षेशी संबंधित एका महत्त्वाच्या मिशनची जबाबदारी तारिणीवर सोपवण्यात आली आहे. या मिशनचं नाव आहे ‘ऑपरेशन तिरंगा’!
तारिणीने आजवर अनेक वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आपल्या धाडसाची आणि बुद्धिमत्तेची झलक दाखवली आहे. मुलांच्या अपहरणाचं प्रकरण असो, बनावट पनीरच्या घोटाळ्याचा पर्दाफाश असो किंवा कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मार्फत होणारी अमली पदार्थांची तस्करी असो, प्रत्येकवेळी ‘तारिणी’ने आव्हान स्वीकारत गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्यासाठी न्याय, सत्य आणि नागरिकांची सुरक्षा हे नेहमीच सर्वोच्च राहिलेलं आहे. त्यामुळेच संकट कितीही मोठं असलं तरी, त्याचा सामना करण्यासाठी तारिणी कायम सज्ज असते. या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना तारिणीने आपल्या वैयक्तिक आयुष्यालाही तितकंच महत्त्व दिलं आहे. एक आदर्श मुलगी, नात आणि पत्नी म्हणून आपल्या कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या ती मनापासून निभावताना दिसली आहे. कर्तव्य आणि कुटुंब यांचा समतोल साधत तारिणीने आपल्या व्यक्तिमत्त्वाची एक वेगळीच बाजू प्रेक्षकांसमोर आणली आहे.
आता मात्र तारिणीसमोरचं आव्हान अधिक मोठं आणि देशाच्या सुरक्षेशी जोडलेलं आहे. एका महत्त्वाच्या मिशनसाठी तारिणीची निवड करण्यात आली असून तिला ‘ऑपरेशन तिरंगा’ची जबाबदारी देण्यात आली आहे. या मिशनचं नेमकं स्वरूप काय आहे? देशाला वाचवण्यासाठी तारिणीला कोणत्या धोक्याचा सामना करावा लागणार आहे? या मोहिमेसाठी तिला कुठे पाठवलं जाणार आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तारिणी ही मोहीम एकटीच पार पाडणार आहे की तिच्यासोबत काही खास व्यक्ती असणार आहेत? हे येणाऱ्या भागांमध्ये प्रेक्षकांसमोर येईल. यानिमित्ताने मालिकेत ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर यांची एन्ट्री होणार आहे.
या मिशनमध्ये तारिणीसमोर कोणती नवी आव्हानं उभी राहणार आणि देशासाठीचं हे मिशन ती कशा पद्धतीने पूर्ण करणार, याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे.
‘ऑपरेशन तिरंगा’च्या निमित्ताने तारिणीच्या आयुष्यातील हा नवा अध्याय तिच्या आतापर्यंतच्या सगळ्या मोहिमांपेक्षा वेगळा आणि अधिक थरारक असणार आहे. तारिणीच्या या विशेष मिशनची सुरुवात आणि त्यामागचं नेमकं रहस्य स्वातंत्र्यदिन विशेष आठवड्यात पाहायला मिळणार आहे. ही मालिका झी मराठीवर रात्री ९:३० वाजता प्रसारित केली जाते.
