Zee Marathi Tarini Serial : ‘तारिणी’ मालिकेत सुरुवातीला दयानंद खांडेकर आणि केदार यांच्यातील सुंदर बॉण्डिंग प्रेक्षकांना पाहायला मिळालं होतं. कारण, तेव्हा दयानंद खांडेकरच आपले खरे बाबा आहेत हे सत्य केदारला माहिती नव्हतं. पण, ज्यावेळी या सगळ्याचा खुलासा झाला…तेव्हा केदार दयानंद खांडेकरांपासून आपोआप दुरावला गेला. तो आपल्या जन्मदात्या वडिलांशी बोलतही नव्हता. फक्त ‘मिशन गृहप्रवेश’चा एक भाग म्हणून केदारने तारिणीबरोबर लग्न करून खांडेकरांच्या घरात एन्ट्री घेतली होती. मात्र, आता हळुहळू परिस्थिती बदलत जातेय.
दयानंद खांडेकरांना खुनाच्या आरोपाखाली अटक केली जाते. जयरामचा खून दयानंद यांनी केलेला नाहीये हे सगळं षडयंत्र आहे याची पूर्ण खात्री तारिणीला असते. ती आपल्या सासऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी असते. पण, युवराज केदारचे कान भरतो आणि दयानंद खांडेकर कसे चुकीचे आहेत हे त्याच्या मनात जाणूनबुजून भरवून देतो. यामुळे केदार आपल्या बाबांना अजिबात सपोर्ट करत नाही.
मात्र, एक क्षण असा येतो…ज्यावेळी केदारला तारिणीची बाजू पटते आणि जयरामचा फोन रिकव्हर झाल्यावर तो स्वत: मिशनच्या जागी पोहोचतो. यावेळी शेवटच्या व्हिडीओमध्ये जयराम असं काही सांगतो…ज्यामुळे आपल्या आईच्या मृत्यूला बाबा जबाबदार नाहीयेत हे सत्य केदारसमोर उघड होतं. आपण आजवर खांडेकरांना चुकीचं समजत होतो याची जाणीव कुठेतरी केदारला होते.
दुसरीकडे, दयानंद खांडेकर अगदी हतबल होतात. आपला पोटचा मुलगा आपल्यापासून दुरावला गेलाय ही खंत त्यांच्या मनात असते. पण, या सगळ्यात एक मोठा ट्विस्ट येणार आहे. दयानंद खांडेकर सगळ्यांना वैतागून जीव द्यायला जातात. ते रस्त्याच्या मध्यभागी धावत्या ट्रकसमोर जाऊन उभे राहतात आणि इतक्यात केदार येऊन त्यांना वाचवतो.
यावेळी दयानंद खांडेकर आक्रोश करून त्याला विचारतात, “केदार का वाचवलंस मला?” यावर केदार पहिल्यांदाच त्यांच्यासमोर आपल्या मनातील भावना व्यक्त करतो. तो म्हणतो, “बाबा…आई मला आधीच सोडून गेलीये. आता पुन्हा एकदा मला पोरकं करणार आहात का?” यानंतर हे बापलेक एकमेकांना घट्ट मिठी मारतात. या दोघांमधला दुरावा अखेर मिटणार आहे.
या दोघांना दूरवर उभी असलेली तारिणी बघत असते. बापमुलाचं हे प्रेम पाहून तिला अश्रू अनावर होतात. हा विशेष भाग २७ एप्रिलला रात्री ९:३० वाजता ‘झी मराठी’वर पाहायला मिळणार आहे.
नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “खूप छान सुरूये मालिका…आता पुन्हा स्लॉट लीडर राहणार… काही वादच नाही”, “दयानंद-केदारचं नातं असंच सुधारुदेत”, “आता मजा येणार वाह…हेच हवं होतं”, “तारिणी तारीफ करू तेवढी कमी आहे”, “वाह वाह मजा येणार काय मस्त स्टोरी सुरू केलीत”, “स्लॉट लीडर फॉर रिझन” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.
