Tarini Proposal Promo : गेल्या वर्षभरापासून ‘तारिणी’ मालिकेचे चाहते ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर मालिकेत येत्या काही दिवसांतच पाहायला मिळणार आहे. केदारचं तारिणीवर मनापासून प्रेम असतं. मात्र, हे प्रेम तो कधीच तिच्यासमोर व्यक्त करत नाही. त्यानंतर मिशन गृहप्रवेशाच्या निमित्ताने या दोघांचं एकमेकांशी लग्न होतं. पण, हे लग्न केवळ एक कॉन्ट्रॅक्ट असून, खरा गुन्हेगार पकडला गेल्यावर आपण या नात्यातून वेगळं व्हायचं असं तारिणीने आधीच केदारला सांगितलेलं असतं.

केदारचे चांगले गुण, त्याचा स्वभाव या सगळ्या गोष्टी पाहून तारिणी आपसूकच त्याच्या प्रेमात पडते. केदारबद्दलच्या भावना ती सगळ्यात आधी रेवाला सांगते. मिशनच्या दिवशी जेव्हा तारिणीला गोळी लागते…त्याच क्षणाला ती आपल्या मनातल्या भावना केदारसमोर बोलून दाखवते. पण, तारिणीची शुद्ध हरपल्यामुळे केदार तिला कोणतंच उत्तर देत नाही. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताना तारिणीच्या मनात हा विचार सतत येत असतो की, केदारने आपल्याला अजून उत्तर का दिलं नाही…शेवटी ती कंटाळून स्वत:च याबद्दल केदारला विचारते.

ठरलेल्या प्लॅनप्रमाणे, केदार तारिणीला त्याचं वेगळ्याच मुलीवर प्रेम असल्याचं सांगतो. केदारच्या आयुष्यातली ‘ती’ मुलगी नेमकी कोण आहे हे तारिणीला सुद्धा जाणून घ्यायचं असतं. खरंतर, केदारला दुसरं कोणीतरी आवडतंय हे ऐकून तारिणीला प्रचंड दु:ख होतं. पण, केदारला त्याचं प्रेम अगदी हटके स्टाईलने व्यक्त करायचं असतं.

आता केदार तारिणीला त्याच्या आयुष्यातल्या ‘तिला’ भेटायला घेऊन जाणार आहे. ज्याठिकाणी केदार-तारिणीची पोलीस ट्रेनिंग झालेली असते…त्याच ग्राऊंडवर तो तारिणीला घेऊन जातो. हातात बंदूक देऊन पुन्हा एकदा बंदुकीचा नेम लावण्यास सांगतो. तारिणी जेव्हा अचूक नेम साधते तेव्हा आकाशात फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाल्याचं तिला पाहायला मिळतं. आता केदार हळूच तारिणीच्या कानात म्हणतो, “तुला माझ्या आयुष्यातल्या तिला भेटायचं होतं ना…भेट मग”

तारिणी आकाशात फटाक्यांची आतिषबाजी पाहत असते…यात तिला स्वत:चा चेहरा दिसतो. हे हटके प्रपोजल पाहून तारिणीचे डोळे पाणावतात. केदारला आवडणारी ती मुलगी दुसरी-तिसरी कोणीही असून आपणच आहोत…हे जाणून घेतल्यावर तारिणीला अश्रू अनावर होतात.

तारिणीच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. मालिकेत कौशिकी खांडेकर ही भूमिका साकारणाऱ्या अभिज्ञाने या प्रोमोवर “Aww विथ रेड हार्ट्स” अशी कमेंट केली आहे. तर अन्य नेटकऱ्यांनी “वॉव बॉस स्टाइल प्रपोजल”, “बेस्ट बेस्ट…किती महिने या क्षणाची वाट पाहिली”, “याला म्हणतात प्रपोजल”, “नेहमीपेक्षा वेगळं आणि हटके प्रपोजल”, “तारिणी लव्ह केदार बेस्ट प्रोमो”, “मस्तच मजा” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.

दरम्यान, ‘तारिणी’चा हा विशेष भाग २९ आणि ३० जूनला रात्री ९:३० वाजता प्रसारित केला जाईल.