Tarini Upcoming Twist: टीव्हीवर दिसणाऱ्या काही जोड्या प्रेक्षकांच्या लाडक्या असतात. सिद्धू-भावना, स्वानंदी-समर, सावली-सारंग, मीरा-अथर्व या आणि अशा झी मराठी वाहिनीवरील जोड्या प्रेक्षकांच्या लाडक्या आहेत. याबरोबरच झी मराठी वाहिनीवरील आणखी एक जोडी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. ही जोडी म्हणजे तारिणी आणि केदार यांची आहे.
झी मराठी वाहिनीवरील ‘तारिणी’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. टीआरपीच्या शर्यतीतसुद्धा ही मालिका तिचे स्थान टिकवून ठेवते. मालिकेत दाखविल्याप्रमाणे, तारिणी स्पेशल क्राइम युनिटची प्रमुख आहे.
याच टीममध्ये केदारही आहे. समाजात, आजूबाजूला घडणारे गुन्हे थांबवण्याचे काम हे युनिट करते. तसेच, गुन्हेगारांना अद्दलही शिकवते. या सगळ्यांत हे युनिट पडद्यामागे राहून काम करते. या युनिटबद्दल लोकांना कल्पना आहे, पण यामध्ये नेमकं कोण काम करते तसेच हे युनिट कसे काम करते, याबद्दल कोणालाही कल्पना नाही.
“तुझ्यावर प्रेम करण्यात कुठे कमी पडलो?”
एका प्रकरणाचा तपास लावण्यासाठी तारिणी आणि केदार सध्या खांडेकर कुटुंबात पती-पत्नी म्हणून राहत आहेत. जेव्हा त्यांनी सुरुवातीला सर्वांना सांगितले की त्यांनी लग्न केले, तेव्हा सर्वांना धक्का बसला होता. पण, खरेतर त्यांनी लग्न केलेलेच नाही. आता खांडेकर कुटुंब सर्वांच्या साक्षीने त्यांचे लग्न लावून देणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
झी मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामवर तारिणी मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, कौशिकी तारिणी आणि केदारच्या खोलीत येते. ती तारिणीला म्हणते की आमच्या मनात तुझं आणि केदारचं पुन्हा लग्न लावून देण्याचा विचार आला आहे. त्यावर तारिणी म्हणते, “मी या लग्नाला तयार नाही, सारखी सारखी तीच चूक केली ती घोडचूक होते.”
त्यानंतर केदार म्हणतो, “तुझ्यावर प्रेम करण्यात कुठे कमी पडलो गं?”, त्यावर तारिणी म्हणते, “हा लग्नाआधी इतका छान वागायचा ना माझ्याशी, पण माणसाच्या अंगात शिस्तच नसेल तर काय करायचं?” तारिणीच्या या बोलण्यावर केदार हात जोडत म्हणतो, “एवढाच त्रास होतोय ना? जा बाई जा, मला तुझ्याबरोबर राहायचं नाही “, केदारचे बोलणे ऐकून तारिणी तिची बॅग घेते आणि म्हणते की मलाच तुझ्याबरोबर राहायचं नाही.” कौशिकी त्यांचे भांडण थांबवण्याचा प्रयत्न करते, पण त्यांचे भांडण थांबत नाही. मात्र, केदार आणि तारिणी हे खरेखुरे लग्न टाळण्यासाठी भांडण करण्याचे नाटक करत असल्याचे दिसत आहे.
आता हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “खऱ्या लग्नाच्या संकटातून स्वत:ला सोडविण्यासाठी तारिणी केदारची नवी चाल”, अशी कॅप्शन दिली आहे. दरम्यान, आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

