Zee Marathi Tarini Serial Updates : ‘तारिणी’ मालिकेत दर आठवड्याला प्रेक्षकांना वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळतात. मात्र, आता केदार आणि तारिणीच्या नात्यात हळूहळू उमलणाऱ्या भावना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. याशिवाय टीम तारिणी एका नव्या मिशनवर निघाली आहे. शहरात सुरू असलेल्या ऑर्गन ट्रॅफिकिंग रॅकेटचा ( मानवी अवयव तस्करी ) पर्दाफाश करण्यासाठी रेवाला गुपचूप युवराजकडून माहिती मिळवायची आहे. टीम तारिणीला समजलंय की, युवराजला रेव्ह पार्टीच्या लोकेशनबद्दल माहिती आहे. यामुळेच आता रेवा युवराजला भेटायला जाणार आहे.

आता रेवाचा युवराजकडून माहिती मिळवण्याचा प्लॅन यशस्वी होणार का? आणि या मिशनदरम्यान टीम तारिणीला आणखी कोणती नवीन माहिती मिळणार? त्यांच्यासमोर कोणते नवे खुलासे उलगडणार? हे मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. त्यामुळे सर्वांच्या मनात आता उत्सुकता निर्माण झाली आहे.

दुसऱ्या बाजूला केदारला आयुष्यात प्रेमाची चाहूल लागली आहे. त्याला आवडणारी मुलगी दुसरी-तिसरी कोणी नसून तारिणीच आहे, हे तो रेवाला सांगतो. मात्र तारिणीला आपल्या भावना कशा सांगायच्या, त्याने लिहिलेलं प्रेमपत्र तारिणीला कसं द्यायचं याची चिंता केदारला सतावत असते.

दरम्यान, तारिणी तिच्या आयुष्याच्या जोडीदारामध्ये असावेत असे पाच ‘ग्रीन फ्लॅग’ गुण रेवाला सांगते. त्यामध्ये “माझ्यासाठी उभा राहणारा”, “बाईपण जपणारा आणि आदर करणारा असावा”, “मनातलं जाणून घेणारा नाही तर मनातलं सांगणारा हवा”, “सुरक्षिततेची हमी देणारा असावा” आणि “माझ्यासह माझ्या कुटुंबालाही स्वीकारणारा” असे गुण आहेत. विशेष म्हणजे केदारने यातील काही गुण आधीच आपल्या वागण्यातून सिद्ध केले आहेत.

घरातील वादाच्या वेळी त्याने तारिणीची ठाम बाजू घेतली होती. तसेच स्त्रियांचा आदर करणारा आणि बाईपण जपणारा त्याचा स्वभावही तारिणीच्या मनाला भावला आहे. येत्या भागांमध्ये आणखी काही प्रसंगांमधून केदार तारिणीच्या मनात आपली खास जागा निर्माण करताना दिसणार आहे.

आता तारिणीला जाणवेल का की केदारच तिच्या मनातल्या जोडीदाराच्या कल्पनेत बसतो? टीम तारिणीचं मिशन यशस्वी होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना तारिणीच्या आगामी भागात पाहायला मिळतील. ‘तारिणी’ दररोज रात्री ९.३० वाजता झी मराठीवर प्रसारित केली जाते.