Tarini Upcoming Twist: ‘तारिणी’ ही मालिका कमी काळात लोकप्रिय ठरली. या मालिकेतील सर्वच पात्रे प्रेक्षकांची लाडकी आहेत. मालिकेत सतत कोणते ना कोणते ट्विस्ट येतात. त्यामुळे पुढे काय घडणार, याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली असते.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे केदार आणि तारिणी हे स्पेशल क्राइम ब्रँचमध्ये काम करतात. ते कधीच स्वत:ची ओळख समोर आणत नाहीत. पडद्यामागे राहून ते अनेक केस सोडवतात. तसेच, अडचणीत असलेल्यांची मदत करतात. आजपर्यंत त्यांच्या युनिटमधील कोणाचीही ओळख समोर आली नाही. ते एक केस सोडवत आहेत, ज्यामध्ये युवराज खांडेकर गुन्हेगार आहे. त्याला पकडण्यासाठी तारिणी आणि केदार नवरा-बायको म्हणून खांडेकरांच्या घरी राहत आहे.
युवराजचा डाव केदारच्या जीवावर बेतणार का?
विशेष म्हणजे केदार हा दयानंद खांडेकरांचा मुलगा आहे. हे सत्य अनेक वर्षानंतर केदारला समजले. दयानंद खांडेकरांनादेखील केदारबद्दल कल्पना नव्हती. मात्र जेव्हा सत्य समोर आले, तेव्हा दयानंद खांडेकरांनी त्याला घरी बोलावले. सन्मानाने राहण्यास सांगितले. केदारचा मात्र त्यांच्यावर राग आहे. या सगळ्यात युवराजलादेखील केदार आणि तारिणी आवडत नाही. तो सतत त्यांच्याविरुद्ध कट-कारस्थाने करतो.
काही दिवसांपूर्वी तारिणी आणि केदारने सर्वांसमोर युवराज-निशिताची चूक त्यांना दाखवून दिली. त्यावेळी युवराजचा अपमान झाला. आता त्याचा बदला घेण्यासाठी तो केदारला त्रास देत असल्याचे पाहायला मिळत आहे.
झी मराठी वाहिनीने तारिणी मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, युवराज केदारला मारण्यासाठी काही गुंड पाठवतो. तो त्यांना फोन करून सांगतो, “तो जिंवत राहिला नाही पाहिजे.” केदार गुंडांना प्रत्युत्तर देत असतो. तितक्यात त्याला युवराज दिसतो. जर त्याच्यासमोर गुंडांना मारले, तर त्याची खरी ओळख युवराजला समजेल, म्हणून तो त्या गुंडांचा मार खातो. युवराज त्याचे शूटिंग करत असतो. याचदरम्यान, केदारला तारिणीचा फोन येतो. केदार बोलत नसल्याचे पाहून तिला त्याची काळजी वाटत असल्याचे पाहायला मिळते. केदारच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे दिसते. तो खाली पडतो. युवराज गुंडांना फोन करून सांगतो, “दगडाने त्याचं डोकं ठेचून टाका.”
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “युवराजचा डाव केदारच्या जीवावर बेतणार का?”, अशी कॅप्शन दिली आहे.
आता तारिणी केदारच्या मदतीला धावून येणार का, ती त्याला वाचवू शकणार का, युवराजचे सत्य सर्वांसमोर कधी येणार, मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
