Tarini Upcoming Twist: तारिणी या मालिकेत नुकतीच युवराजची तुरुंगातून सुटका झाल्याचे पाहायला मिळाले. गुन्हेगार गुलाबबरोबर संबंध असल्याच्या कारणास्तव त्याला अटक करण्यात आली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने घरच्यांना विशेषत: वडील दयानंद खांडेकर व बहीण कौशिकी यांना काळजी नसल्याचे सुनावले. तसेच, तारिणीच्या जबाबामुळे त्याला तुरुंगात जावे लागले होते आणि त्यामुळे त्याने तिला धडा शिकवण्याचा निर्धार केला. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होत असलेल्या या मालिकेत विविध ट्विस्ट येताना दिसतात.

जेव्हा युवराज तुरुंगातून बाहेर आला, त्यावेळी त्याला गुलाबच्या बॉसचा फोन आला होता, ज्याचा शोध तारिणी व तिची टीम अनेक दिवसांपासून करीत आहे. आता तारिणी व केदार यांच्यावर संकट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

तारिणी मालिकेत काय घडणार?

झी मराठी वाहिनीने ‘तारिणी’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की, तारिणी व केदार पूजा करीत आहेत. गुरुजी केदार व तारिणीला सांगतात की, हा कलश डोक्यावर घ्यायचा आणि संपूर्ण घराला प्रदक्षिणा मारायच्या. कलश घेऊन तारिणी उठत असते. त्यावेळी तो नारळ खाली पडतो. त्यानंतर गुरुजी म्हणतात, “घरावर काहीतरी संकट ओढवणार आहे, असं दिसतंय.”

गुरुजींचे बोलणे ऐकल्यानंतर तारिणी खाली बसते. नारळ पुन्हा कलशावर ठेवत म्हणते, “जे काही संकट येणार आहे, ते माझ्यावर येऊ दे.” केदार तारिणीला म्हणतो, “संकटाचा सामना करण्यासाठी मी तुझ्याबरोबर आहे.” त्याचे बोलणे ऐकून तारिणी हसत असल्याचे दिसत आहे.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘घरावर संकट येणार, तारिणी-केदार ते मिळून परतवणार’, अशी कॅप्शन दिली आहे. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्याची उत्सुकता असल्याचे लिहिले आहे.

तारिणी व केदार हे स्पेशल क्राइम युनिटमध्ये काम करतात. विविध गुन्ह्यांचा ते शोध घेतात. त्यामुळे मालिकेत अॅक्शन सीनही पाहायला मिळतात. दरम्यान, आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.