Tarini upcoming twist: ‘तारिणी’ मालिकेत येणारे ट्विस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. युवराजचे कारस्थान, डॉक्टर कामत करत असलेले गुन्हे, सुमी आजीचा तारिणीवरचा विश्वास, खांडेकर कुटुंबात घडणाऱ्या घडामोडी, कौशिकीचे एमएनएन न्यूज चॅनेल, केदारची तारिणीला असलेली साथ; अशा अनेक गोष्टींमुळे ‘तारिणी’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

“तिच्या वर्दीतल्या आईला २० वर्षांपूर्वी संपवलं”

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, तारिणीच्या आईने आत्महत्या केल्याचे म्हटले जाते. पण, तारिणीला त्यावर विश्वास नाही. कारण तिची आई खंबीर होती, धाडसी होती, त्यामुळे तिला तिच्या आईच्या मृत्यूमागे कोण आहे हे जाणून घ्यायचे आहे. त्याचा ती शोध घेत आहे. आता जो डॉक्टर कामत अवैध कामे करत आहे, तोच डॉक्टर कामत तारिणीच्या आईच्या मृत्यूला कारणीभूत आहे का? तसेच तारिणी एक ऑफिसर आहे. स्पेशल क्राइम युनिटची प्रमुख आहे हे डॉक्टर कामतला समजणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

झी मराठी वाहिनीने, ‘तारिणी’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की डॉक्टर कामत खांडेकरांच्या घरात आहे. त्याला तारिणीच्या आईचा फोटो दिसतो. तो फोटो हातात घेत तो म्हणतो, “हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरेचा फोटो या घरात?” त्यावर पद्मिनी सांगते, “ही त्या तारिणीची आई आहे.” पद्मिनीचे बोलणे ऐकून डॉक्टर कामत म्हणतात, “तिच्या वर्दीतल्या आईला २० वर्षांपूर्वी संपवलं, ही तारिणी काय चीज आहे? इतक्या कर्तबगार आईची इतकी सामान्य मुलगी?”

दुसरीकडे तारिणी केदारला निर्धाराने सांगते, “हा जो कोणी मास्टरमाईंड आहे, तो लवकरच आपल्या समोर असेल.” ती असेही म्हणते, “बाईला सामान्य समजण्याची चूकच नेहमी पुरुषाला नडते.”

आता हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “मास्टरमाईंड डॉ. कामतसमोर येणार का तारिणीची खरी ओळख?” अशी कॅप्शन दिली आहे.

‘तारिणी’चा हा प्रोमो पाहिल्यानंतर कामतचा खरा चेहरा तारिणीसमोर येणार की तारिणीचे सत्य कामतला समजणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

दरम्यान, आता मालिकेत पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.