Tarini Upcoming Twist: तारिणी आणि केदारची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते. तारिणी केदारची बॉस आहे. त्यांच्यात चांगली मैत्रीही आहे. संकटांच्या वेळी, तसेच जिथे गरज असेल तिथे तारिणी-केदार एकमेकांसाठी उभे असतात. महत्त्वाची बाब म्हणजे तारिणी फक्त मैत्री समजत असली तरी केदारचे तारिणीवर प्रेम आहे; पण आजपर्यंत त्याने कधीही तारिणीला त्याबद्दल सांगितले नाही.
स्पेशल क्राइम युनिटचा भाग असलेल्या तारिणी आणि केदारने एका मिशनसाठी त्यांनी लग्न केल्याचे खोटे सांगितले आहे. खांडेकरांच्या घरात ते पती-पत्नी म्हणून राहत आहेत. मात्र, या सगळ्यात निशीला त्यांच्या खोट्या लग्नाबद्दल समजले आणि ते तिने सर्वांसमोर आणण्याचे ठरवले. त्यासाठी तिने कौशिकीला त्यांना जाब विचारायला सांगितला.
कौशिकीने तारिणी आणि केदारला पुन्हा एकदा सर्वांच्या साक्षीने लग्न करण्याचे सुचवले. त्यावर मार्ग काढत तारिणी व केदारने भांडण्याचे नाटक केले आणि तारिणी तिच्या वडिलांच्या घरी राहायला गेली. आता मात्र मालिकेत मोठा ट्विस्ट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
“तो तुझ्याशी असं काय वाईट…”
झी मराठी वाहिनीने, सोशल मीडियावर तारिणी या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, कौशिकी तारिणीच्या घरी येते. कुटुंबातील सर्व सदस्यांना ती म्हणते, “आमची अशी इच्छा आहे की, त्यांचं विधिवत लग्नसुद्धा व्हावं.” त्यानंतर तारिणी सुमीआजी देवीसमोर हात जोडत म्हणते, “आई जग्दामिनीच्या साक्षीने ही सुमी तुम्हाला शब्द देते की, तारिणी पुन्हा एकदा तुमच्या घरात प्रवेश करील.”
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, तारिणी तिच्या सुमीआजीला म्हणते, “नाही म्हणजे नाही.” त्यावर सुमीआजी म्हणते, “तो तुझ्याशी असं काय वाईट वागला आहे गं? भांडणात तुझ्या माहेरच्यांचं नाव घेतलं का?” त्यावर तारिणी, असं काही नाही, असे सांगते. त्यावर सुमीआजी म्हणते, “पटेल असं कारण दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही.” त्यानंतर तारिणी म्हणते, “मी या लग्नाला तयार आहे; पण, माझी एक अट आहे.”
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘लग्नासाठी काय असेल तारिणीची अट?’, अशी कॅप्शन दिली आहे. तर, प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “जो ट्रॅक इतके दिवस पाहत होतो, अखेर तो पाहायला मिळत आहे”, दुसऱ्या एकाने लिहिले, “तारिणी लग्न कर. नाही तर ती बावळट काव्या केदारबरोबर नको”, अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी तारिणी आणि केदारचे लग्न पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, आता मालिकेत नेमके काय होणार, तारिणीची नेमकी कोणती अट असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

