Tarini Upcoming Twist: ‘तारिणी’ या मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट येतात. तारिणी व तिची टीम स्पेशल क्राइम युनिटचा भाग आहे. स्पेशल क्राइम युनिटमधील कोणत्याही सदस्याबद्दल इतर कोणालाही माहीत नाही. त्यांची ओळख सर्वांपासून लपवली आहे. आता तारिणीची वरिष्ठ अधिकारी जेजे म्हणजेच जया जगदाळे कारस्थान करत असल्याचे समोर आले आहे.

जेजेच्या ‘त्या’ कारस्थानामुळे तारिणी व तिच्या टीमची ओळख सर्वांसमोर येणार का?

मालिकेत दाखविल्याप्रमाणे जेजेला अनोळखी क्रमांकावरून फोन येतो. तिला सांगितले जाते की स्पेशल क्राइम युनिटबद्दल माहिती द्या. तिला पैशांचे आमिष दिले जाते. जेजे ही माहिती देण्यास तयार होते. आता तारिणी व केदारवर संकट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

तारिणी मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, तारिणी व केदार झोपले आहेत. त्यांना कशाचातरी आवाज येतो, ते उठतात. तारिणी केदारला म्हणते की कोण असेल? त्यावर केदार म्हणतो की आपल्याला शत्रूंची कमी थोडीच आहे. तारिणी केदारला म्हणते की, तसं जर असेल तर ती व्यक्ती या घरातून जिवंत जाणार नाही. त्यानंतर केदार व तारिणी त्यांच्या बंदुका घेऊन जातात. त्यांना कोणाचीतरी सावली दिसते. तारिणी बंदूक रोखून धरल्याचे पाहायला मिळते.

याच प्रोमोमध्ये पाहायला मिळते की जेजे स्वत:शीच म्हणते की, एकदा का तुम्हाला त्या मास्टरमाइंडच्या हाती दिलं तर ही जेजे करोडोंमध्ये खेळेल, आरआयपी टीम तारिणी. प्रोमोच्या शेवटी ऐकायला मिळते की, जेजेचा नवीन डाव तारिणी आणि केदारच्या जीवावर बेतणार.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठीने “टीम तारिणी मास्टरमाईंड आणि जेजेच्या जाळ्यात सापडणार का?” अशी कॅप्शन दिली आहे.

या प्रोमोवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “सुंदर प्रोमो आहे”, दुसऱ्या एकाने लिहिले, “इतक्यात ओळख समोर येणार नाही”, एकाने लिहिले, “आता खेळ रंगणार. जेजेचा डाव तारिणी परतावून लावणार”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, मालिकेत नेमकं काय घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.