Tarini Upcoming Twist: ‘ एकाच मालिकेत अॅक्शन, ड्रामा आणि सतत ट्विस्ट पाहायला मिळत असतील तर अशा मालिका लोकप्रिय ठरतात. उत्तम गोष्ट आणि कलाकारांचा सहज अभिनय यांमुळे मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत जाते. अशाच मालिकांपैकी एक तारिणी ही मालिका आहे.
गेल्या काही दिवसांपासून तारिणी मालिकेत नवनवीन ट्वि्स्ट येताना दिसत आहेत. स्पेशल क्राइम युनिटचा भाग असलेले तारिणी आणि केदार यांनी एका मिशनसाठी लग्न केल्याचे खोटे सांगितले आहे. मात्र, त्यांच्या या खोट्या लग्नाबद्दल तारिणीची बहीण निशीला समजले. त्यानंतर त्यांचे सत्य बाहेर आणण्यासाठी निशी, युवराज आणि त्याच्या आईने एक योजना बनवली.
तारणी आणि केदारने आधी कोर्टमॅरेज केले होते. त्यामुळे त्यांचे सर्वांसमोर लग्न लावून द्यावे, असे त्यांनी कौशिकीला सुचवले. त्यानंतर तारिणी आणि केदारने पुन्हा लग्न करावे, असे कौशिकीने सुचवले. सुरुवातीला केदार आणि तारिणी विविध कारणे देऊन खरे लग्न करण्याचे टाळत होते. त्यासाठी त्यांनी भांडण्याचे नाटक केले. तारिणी तिच्या माहेरी निघून गेली.विविध अटी ठेवल्या. आता मात्र मालिकेत मोठा ट्विस्ट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
केदारचे हटके स्टाईल प्रपोज
झी मराठी वाहिनीने तारिणी मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की होळीनिमित्त तारिणी आणि केदार एकत्र आले आहेत. त्यावेळी केदार तारिणीला सांगतो, “तुझा संशय बरोबर ठरला.आपण एका ट्रॅपमध्ये अडकलो आहे.” तो पुढे तारिणीला सांगतो की निशीच्या बोलण्यामुळे हा सगळा लग्नाचा घाट कौशिकीताईने घातला.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की तारिणी केदारला म्हणते, “मी या लग्नाला तयार आहे. या सगळ्यात तू माझी साथ द्यायची की नाही, हे तू ठरवं.” त्यानंतर केदार तारणीला खास अंदाजात प्रपोज करताना दिसत आहे. तो म्हणतो, “बेलसरेंच्या मुलीचा हात मागतोय देवकीचा हा केदार, माझ्याशी लग्न करशील?” त्यानंतर तारिणी हसत तिचा हात त्याच्या हातात देते.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, स्वप्न सत्यात उतरणार, केदार लग्नासाठी तारिणीचा हात मागणार, अशी कॅप्शन दिली आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे, तसेच मालिकेच्या लेखकांचे कौतुक केले आहे.
आता मालिकेत नेमकं काय घडणार, तारिणी आणि केदारच्या लग्नात काय गमतीजमती घडणार, तारिणी केदारच्या प्रेमात पडणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
