Tarini Upcoming Twist: तारिणी या मालिकेतील तारिणी आणि केदार ही प्रेक्षकांची लाडकी पात्रे आहेत. त्यांच्यातील केमिस्ट्री, त्यांच्यातील बॉण्डिंग, छोटे छोटे रुसवे-फुगवे प्रेक्षकांना आवडतात. त्याबरोबरच तारिणीची टीम आणि सुमीआजी, निशी, युवराज, कौशिकी, दयानंद खांडेकर ही पात्रे, तसेच मालिकेतील इतर पात्रेही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात.
तारिणी व केदार हे स्पेशल क्राईम युनिटचा भाग आहेत. ते विविध गुन्ह्यांचा शोध लावतात. काही वेळा त्यांना गुन्हेगारांबरोबर झटापटही करावी लागते, ते निरपराध लोकांचा जीव वाचवतात, सामान्य लोकांना न्याय मिळावा, जनतेचे संरक्षण व्हावे या दृष्टीने काम करीत असतात. मात्र, या सगळ्यात ते त्यांची खरी ओळख इतरांना दाखवत नाहीत. ते ऑफिसर म्हणून सर्वांसमोर येत नाहीत.
अगदी त्यांच्या घरच्यांनादेखील ते ऑफिसर म्हणून काम करीत असल्याचे, तसेच ते स्पेशल क्राईम युनिटचा भाग असल्याचे सत्य माहीत नाही. त्यामुळे ते घरच्यांसमोर साधेपणाने जगतात आणि वेगळी ओळख घेऊन वावरतात.
‘तारिणी’ मालिकेत मोठा ट्विस्ट
केदार व तारिणी एका मिशनवर आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी त्यांना खांडेकर कुटुंबात राहणे गरजेचे होते. केदार हा दयानंद खांडेकरांचा मुलगा आहे. त्यामुळे त्याने आधी खोटे लग्न केले. मात्र, त्यानंतर सुमीआजी, कौशिकी व दयानंद खांडेकर यांच्या आग्रहाखातर त्यांना खरे लग्न करावे लागले. तारिणीने केदारला सांगितले की, जेव्हा तुला वाटेल तेव्हा तू या नात्यातून बाहेर पडू शकतोस. तिला माहीत नाही की, केदारचे तिच्यावर प्रचंड प्रेम आहे. आता मात्र मालिकेत एक नवीन एन्ट्री होणार आहे. त्यामुळे केदारला ईर्षा वाटणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर तारिणी या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, तारिणी तिच्या स्पेशल क्राइम युनिटच्या टीमबरोबर आहे. ती सर्वांना सांगते की, आपल्या टीममध्ये एक नवीन मेंबर जॉईन होणार आहे. शिस्तबद्ध, वक्तशीर, कर्तृत्ववान, धडाकेबाज ऑफिसर हरप्रीत चड्ढा. त्यानंतर तारिणी तिथून निघून जाते. टीममधील एक जण म्हणतो, “बॉसकडून एका ऑफिसरसाठी एवढी विशेषणं?” दुसरा म्हणतो, “बॉसचा चेहरा खुलला होता.” आणखी एक जण म्हणतो, “बॉस, तुम्हाला त्या नजरेनं कधीच बघू शकत नाहीत.” चौथी ऑफिसर म्हणते, “पण त्या हरप्रीतला कोणत्या नजरेनं बघतील काय माहीत?” हे सर्व ऐकून केदारच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागते.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘टीम तारिणीमध्ये होणार एका धडाकेबाज ऑफिसरची एन्ट्री’, अशी कॅप्शन दिली आहे.
दरम्यान, हरप्रीत चड्ढा ही भूमिका कोण साकारणार, कोणत्या कलाकाराची एन्ट्री होणार, त्याच्या एन्ट्रीनंतर केदार व तारिणीच्या नात्यात काही बदल होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पुढे मालिकेत काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
