Tarini upcoming twist: ‘तारिणी’ मालिकेतील तारिणी ही अन्यायाविरुद्ध लढणारी आहे. ती सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गुन्हेगारांशी दोन हात करताना दिसते. आता ती एका मुलीची छेड काढणाऱ्या मुलाला धडा शिकवणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

तारिणी घेणार नारायणीचा अवतार

झी मराठी वाहिनीने ‘तारिणी’ मालिकेचा प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की रस्त्यावरुन एक मुलगी जात असते. तिला एका मुलाचा धक्का लागतो. ती त्याला म्हणते, “तुम्हाला बघून चालता येत नाही का?” त्यानंतर तो मुलगा तिला त्रास देतो. तो तिला म्हणतो की तू मला शिकवणार नीट कसं चालायचं ते? त्यानंतर तो त्या मुलीला ढकलून देतो आणि तिची ओढणी हातात घेतो. तितक्यात तिथे तारिणी येते. ती त्याला थांबवते.

त्याचदरम्यान ऐकायला येते की जेव्हा जेव्हा पृथ्वी तलावावर अन्यायाचा अंधार दाटला आहे. तेव्हा तेव्हा मायेचं रुपांतर कालीच्या रौद्ररुपात झालं. रक्तबीज नावाचा एक राक्षस होता. त्याला ब्रम्हदेवाने वरदान दिलं होतं. पण, त्याला एका स्त्रीचं सामर्थ्य माहीत नव्हतं. जग जिला अबला म्हणतं ना, तिने ठरवलं तर ती रणही छेडू शकते. फक्त तिला स्वत:ची ओळख व्हायला हवी आणि प्रत्येक संकटात जेव्हा नारी खंबरीपणे उभी राहते ना, तेव्हा नारायणीचा जन्म होतो.

यावेळी तारिणीचा रुद्रावतार पाहायला मिळतो. ती त्याला मुलाला धडा शिकवत असल्याचे पाहायला मिळते. शेवटी तारिणी पीडित मुलीला म्हणते, “लक्षात ठेव. या कलियुगात प्रत्येक स्त्रीला नारी ते नारायणी हा प्रवास स्वत:च करावा लागतो.” त्यानंतर ती तिला सुरक्षितपणे तिथून घेऊन जात असल्याचे पाहायला मिळते.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “तारिणी घेणार नारायणीचा अवतार, करणार असुरांचा संहार”, अशी कॅप्शन दिली आहे.

तारिणी मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव केला आहे. आता प्रेक्षक मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत.