Tarini upcoming twist: ‘तारिणी’ ही अशी मालिका ज्यामध्ये जितकी भांडणे पाहायला मिळतात, जितकी कट-कारस्थाने पाहायला मिळतात, तितकेच अॅक्शन सीक्वेन्सदेखील पाहायला मिळतात.
तारिणी आणि केदार हे स्पेशल क्राइम युनिटचा भाग आहेत. त्यामुळे विविध केसमध्ये त्यांना गुंडांचा सामना करावा लागतो. त्यावेळी मारामारी होते. जेव्हा ही टीम एखादी केस सोडवत असते, त्यावेळच्या एपिसोडला चांगली पसंती मिळते.
आता तारिणी मालिकेत पुन्हा एकदा अॅक्शन सीक्वेन्स पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच जेव्हा कौशिकीची प्रकृती ठीक नव्हती. त्यावेळी केदारने एमएनएन या न्यूज चॅनेलमध्ये तिच्या ऐवजी राजकारणी बापुराव जामखंडे यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत त्याने जामखंडेंना असे प्रश्न विचारले होते, ज्यामुळे त्यांचे पितळ उघडे पडले होते. आता त्यामुळे बापुराव जामखंडेंचे कार्यकर्ते नाराज झाले असून ते केदारला मारण्यासाठी खांडेकरांच्या घरी पोहोचले असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
तारिणी घेणार रणरागिणीचा अवतार
झी मराठी वाहिनीने तारिणी मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की खांडेकरांच्या घराबाहेर काही लोकांचा घोळका आला आहे. ते बापुराव जामखंडे जिंदाबाद अशा घोषणा करत आहेत. ते म्हणतात की आमच्या बापुसाहेबांचा अपमान झाला आहे. तितक्यात तारिणी येते आणि म्हणते की केदारने काय चुकीच केलं आहे? त्याने तुमच्या साहेबांचं सत्य जगासमोर आणलं आहे. तारिणीचे बोलणे ऐकून कार्यकर्त्यांना राग येतो आणि ते घरात घुसण्याचा प्रयत्न करतात.
तारिणी घरातील इतर स्त्रियांच्या मदतीने दरवाजा लावते आणि त्यांना सांगते आपण एका खोलीत जाऊन लपून बसूयात. सगळेजण लपल्यानंतर तारिणी घराचा दरवाजा उघडते आणि ते कार्यकर्ते घरात येतात. त्यानंतर तारिणी त्यांना धडा शिकवत असल्याचे दिसत आहे. तारिणी आणि गुंडांमध्ये मारामारी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “केदारसाठी तारिणी प्रत्येक संकटाला भिडणार”, अशी कॅप्शन दिली आहे. या प्रोमोवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे केदार आणि तारिणी हे स्पेशल क्राईम युनिटचा भाग आहे, हे कोणालाही माहित नाही. या युनिटमधील कोणाचीही खरी ओळख इतरांना माहित नाही. त्यामुळे ते एकाच वेळी दोन आयुष्ये जगताना दिसतात. आता केदार कौशिकीच्या एमएनएन या न्यूज चॅनेलमध्ये काम करताना दिसत आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय ट्विस्ट येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

