Tarini upcoming twist: ‘तारिणी’ मालिकेत सतत कोणते ना कोणते ट्विस्ट येताना दिसतात. तारिणी ही धाडसी मुलगी आहे. ती प्रत्येक संकटाला धाडसाने सामोरे जाते. याबरोबरच, ती शांत, संयमी आणि कर्तव्यनिष्ठ मुलगी आहे.

झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होत असलेल्या तारिणी ही मालिका सध्या लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा दिवसेंदिवस मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अनेकदा ही मालिका स्लॉट लीडर ठरताना दिसते. तर टीआरपीच्या शर्यतीतही आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते

तारिणी मालिकेत सतत कोणते ना कोणते ट्विस्ट येतात. या मालिकेत एक स्पेशल क्राइम युनिट पाहायला मिळते. या युनिटमध्ये कोण आहे, ते काय करतात, कुठे काम करतात, याबद्दल कोणालाही कल्पना नाही. मात्र, हे युनिट अडचणीत असलेल्यांना कायमच मदत करते.

तारिणी या युनिटची हेड आहे. केदार तिच्या टीममध्ये काम करतो. केदार खांडेकर कुटुंबाचा भाग आहे, तो दयानंद खांडेकरचा मुलगा आहे, हे सत्य काही दिवसांपूर्वीच समोर आले. त्यानंतर केदारच्या मनात दयानंद खांडेकरविरुद्ध राग होता. दयानंदच्या मनात पश्चात्तापाची भावना होती. जेव्हा दयानंदला खांडेकर कुटुंबात येऊन राहण्याविषयी सांगितले तर त्याने सुरुवातीला नकार दिला होता. मात्र, जेव्हा युवराज काहीतरी कारस्थान करत आहे, हे तारिणीच्या लक्षात आले. तेव्हा तिने खांडेकर कुटुंबात राहण्याचा निर्णय घेतला.

तारिणीने केदारला आपण पती-पत्नी म्हणून खांडेकरांच्या घरी राहू असे सांगितले. त्यानंतर आता ते खांडेकरांच्या घरी राहत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच पाहायला मिळाले की कौशिकी आजारी पडल्यानंतर तिच्याऐवजी केदारने बापुराव जामखंडेंची मुलाखत घेतली. त्यानंतर कौशिकी त्याला एक ऑफर देणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

“एमएनएनला तुझी गरज आहे म्हणून मी…”

झी मराठी वाहिनीने तारिणी मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की दयानंद कौशिकीला विचारतो, “आपण केदारला एमएनएन जॉईन करून घेऊयात का?” त्यावर कौशिकी म्हणते, “केदारला आपलं म्हणणं पटले का?”

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की कौशिकी आणि दयानंद खांडेकर केदारकडे गेले आहेत. केदार स्पष्टपणे नाही म्हणतो. तो म्हणतो,”एमएनएन चॅनेल जॉईन करणं माझ्याकडून होणार नाही.” त्यावर कौशिकी त्याची समजूत काढत म्हणते, “एमएनएनला तुझी गरज आहे म्हणून मी म्हणत आहे.” त्यावर स्वत:च्या मतावर ठाम राहत केदार म्हणतो, “खांडेकरांच्या कोणत्याही गोष्टीत सामील होण्याची माझी इच्छा नाही.”

पुढे दयानंद आणि कौशिकी गेल्यानंतर केदार तारिणीला म्हणतो, “मला त्यांच्याशी काहीच घेणंदेणं नाहीये.” त्यावर तारिणी म्हणते, “मी जर असं म्हणाले की हा माझ्या मिशनचाच भाग आहे. तर?” त्यानंतर केदार तारिणीकडे प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहत असल्याचे दिसत आहे.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “केदार स्वीकारेल का कौशिकीने आणलेली नवी संधी?”, अशी कॅप्शन दिली आहे.

दरम्यान, आता केदार काय निर्णय घेणार, यावर युवराजची काय प्रतिक्रिया असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.