Tarini Upcoming Twist: ‘तारिणी’ या मालिकेत दररोज नवीन काहीतरी घडताना दिसते. स्पेशल क्राइम युनिटचा भाग असलेले तारिणी आणि केदार घर व काम एकाचवेळी सांभाळतात. दोन्हीकडील जबाबदारी ते व्यवस्थितपणे पार पाडतात. तारिणी व केदार एका मिशनवर काम करत आहेत, त्यांना काही सत्ये शोधून काढायची आहेत. याबरोबरच ते खांडेकर कुटुंबाची जबाबदारीदेखील खंबीरपणे पार पाडत आहेत.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, एका खुनाच्या आरोपात दयानंद खांडेकरांना अटक झाली होती, मात्र तारिणी आणि केदारच्या टीमने सत्य शोधून काढले. खुनामध्ये दुसऱ्याच व्यक्तीचा हात असल्याचे समोर आले आणि दयानंद खांडेकरांची निर्दोष सुटका झाली. त्यानंतर तारिणीवर खांडेकर कुटुंबाची जबाबदारी देण्यात आली.

मोठ्या सुनेची जबाबदारी पार पाडण्यासाठी तारिणीने संपूर्ण कुटुंबीयांसाठी काही नियम तयार केले; त्यामध्ये त्यांची सकाळी उठण्याची वेळ, नाश्त्याची, जेवणाची आणि इतर सर्वच कामांच्या वेळेबाबत नियम सांगितले गेले. ते नियम काटेकोरपणे पाळावे लागतील, नाही तर त्याची कठोर शिक्षाही मिळेल असे तिने सांगितले. खांडेकर कुटुंबातील काहींना तारिणी आणि केदार आधीपासूनच आवडत नाहीत. आता तारिणीने नियम वाचून त्यांना तिचा राग येत असल्याचे पाहायला मिळत आहे.

“तुम्ही आज या घरात पाऊल ठेवायचं नाही…”

आता ‘तारिणी’ मालिकेचा एक प्रोमो लक्ष वेधून घेत आहे, ज्यामध्ये तारिणी युवराजला शिक्षा देणार आहे. झी मराठी वाहिनीने ‘तारिणी’ मालिकेचा एक प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, युवराज दारू पिऊन घरात येतो, तो निशीला ढकलून देतो. त्याला तारिणी विचारते, “तुम्ही दारू पिऊन आला आहात का?” घरात येणाऱ्या युवराजला अडवत ती म्हणते, “तुम्ही आज या घरात पाऊल ठेवायचं नाही.” त्यानंतर दारूच्या नशेतच युवराज घरातील इतरांना म्हणतो, “ही कोण आहे मला सांगणारी?” त्यावर केदार म्हणतो, “ती घरातील मोठी सून आहे, तारिणी केदार खांडेकर.”

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, तारिणी घराचा दरवाजा बंद करते, त्यानंतर युवराज तोल जाऊन खाली पडतो. तो रागात म्हणतो, “खूप खाज आहे ना, खांडेकरांची मोठी सून म्हणून मिरवायची? माझ्या पायाजवळ नाक घासत आणलं नाही ना, तर नावाचा युवराज नाही मी.”

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “घरातील मोठी सून बनून तारिणी युवराजला घडवणार अद्दल”, अशी कॅप्शन दिली आहे.

तारिणी मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “कोण कोणाच्या पायाशी नाक घासेल हे वेळच सांगेल, कळलं का युवराज खांडेकर?”, “TRP मध्ये टॉप असणारी आपल्या सर्वांची आवडती मालिका, तारिणी”, “तुम्ही परफेक्ट आहात”, “या मालिकेने रेकॉर्ड ब्रेक केलं आहे. सतत वाईटातून चांगलंच दाखवलं आहे. शब्द कमी पडतील इतकी कौतुकास्पद मालिका आहे”, अशा अनेक कमेंट्स आहेत.

दरम्यान, आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.