Tejashri Pradhan Birthday : तेजश्री प्रधान मराठी इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिने चित्रपट, मालिकांमधून काम करत प्रेक्षकांच्या मनात आणि इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी जागा निर्माण केली आहे. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आज अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिचा मित्र आणि सहकलाकार अभिनेता अंकुश चौधरीने खास पोस्ट केली आहे.
तेजश्री प्रधानच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता अंकुश चौधरीने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट करत हटके अंदाजात तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी अभिनेत्याने त्यांच्या ‘ती सध्या काय करते’ या लोकप्रिय चित्रपटातील एक व्हिडीओ शेअर करत तेजश्रीला शुभेच्छा दिल्या आहेत.
अंकुश चौधरी व तेजश्री यांनी ‘ती सध्या काय करते’ या लोकप्रिय आणि विशेष करुन तरुणांमध्ये आजही ज्याची प्रचंड क्रेझ असलेल्या या चित्रपटात काम केलं होतं. सतीश राजवाडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. यामध्ये तेजश्री व अंकुश यांच्यासह अभिनय बेर्डे, आर्या आंबेकर, संजय मोने, सुकन्या मोने, उर्मिला कोठारे यांसारखे कलाकार झळकले होते. तेजश्री व अंकुश या चित्रपटात एकमेकांचे जीवलग मित्र असतात आणि ते एकमेकांचं पहिलं प्रेमही असतात. यातील अनुराग व तन्वी या त्यांनी साकारलेल्या पात्रांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली.
अंकुश चौधरीने अशातच आता तेजश्रीच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या व्हिडीओला खास कॅप्शन दिली आहे. यामधून तो म्हणाला, “ती सध्या काय करते? हे लोकांना आजही पडलेलं कोडं आहे… पण तिचा ‘अनुराग’ म्हणून मला माहित आहे, ती सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय”. अंकुशने पुढे तेजश्री प्रधानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत “तुझी मैत्री आजही तितकीच हक्काची आहे. मला तुझा अभिमान आहे” असं म्हणत शेवटी तुझा अनुराग, अन्या असं लिहिलं आहे.
सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘ती सध्या काय करते’ हा रोमँटिक चित्रपट २०१७मध्ये प्रदर्शित झाला होता. आता ९ वर्षानंतरही या चित्रपटाची क्रेझ कायम असून आजही यातील संवाद, सीन, केमिस्ट्री, गाणी प्रेक्षक आवडीणे पाहत आणि ऐकत असतात. अनेक जण सतीश राजवाडे यांच्या चित्रपटाबद्दल भरभरून बोलत असतात.
दरम्यान, तेजश्रीबद्दल बोलायचं झालं तर अभिनेत्री सध्या ‘झी मराठी’वरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत स्वानंदी ही मुख्य नायिकेची भूमिका साकारत आहे. तिच्या या मालिकेलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
