होळीचा सण म्हटला की घराघरांत पुरणपोळ्या बनवल्या जातात. चणाडाळ, गूळ किंवा साखर आणि कणीक वापरून हा गोड पारंपरिक पदार्थ बनवला जातो. काहीजण गरमागरम लुसलुशीत पुरणपोळ्या तूप किंवा दुधासह खातात. तर काही ठिकाणी पुरणपोळ्यांबरोबर कटाची आमची बनवली जाते. मराठी मनोरंजनविश्वातील कलाकारांनी सुद्धा यंदा मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा केला.

अनेक कलाकार शिमगा साजरा करण्यासाठी गावी पोहोचले होते. तर, काही कलाकारांनी शूटिंगच्या व्यग्र शेड्युलमुळे सेटवरच होळी-रंगपंचमी साजरी केली. अभिनेत्री तेजश्री प्रधानने सुद्धा होळीनिमित्त खास पुरणपोळ्या बनवल्या होत्या. हा पोळ्या अभिनेत्रीने खास ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेच्या सेटवर बनवून नेल्या होत्या.

‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत आनंद आणि निकिता हे दोघंही समरचे जवळचे मित्र असतात असं दाखवण्यात आलं आहे. सध्या मल्लिकामुळे आनंद-समरच्या मैत्रीत गैरसमज निर्माण होऊन दुरावा आल्याचं मालिकेत पाहायला मिळालंय. पण, दुसरीकडे स्वानंदीचा आनंद-निकितावर खूप विश्वास असतो. ऑफस्क्रीन सुद्धा या तिघांची मैत्री तेवढीच घट्ट आहे. तेजश्री प्रधानने आनंद आणि निकिताची भूमिका साकारणाऱ्या शर्मिला शिंदेसाठी सेटवर खास पुरणपोळ्या बनवून नेल्या होत्या.

Award Banner

आनंद पुरणपोळीचा फोटो शेअर करत लिहितो, “केवळ प्रेम…तेजश्री ही कमाल पुरणपोळी तू आणलीस थँक्यू सो मच!” या फोटोवर कमेंट करत तेजश्री आनंदला विचारते, “एकट्याने नाही ना संपवली? शर्मिला तुला मिळाली ना?”

शर्मिला या फोटोवर रिप्लाय देत म्हणते, “आनंदची हिंमत की तो मला न देता पुरणपोळी खाईल…थँक्यू सो मच तेजू…आत्मा तृप्त झाला”

tejashri pradhan post
तेजश्री प्रधानची पोस्ट

तेजश्रीने बनवलेल्या पुरणपोळ्या अप्रतिम, चविष्ट झाल्या होत्या असं शर्मिला आणि आनंद यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, ही मालिका ‘झी मराठी’वर दररोज सायंकाळी साडेसात वाजता प्रसारित केली जाते. या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय स्वानंदी-समरची जोडी सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.