Tejashri Pradhan on Marriage: अभिनेत्री तेजश्री प्रधान ही सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत तिने स्वानंदी ही भूमिका साकारली आहे; तर समर या भूमिकेत सुबोध भावे दिसत आहे. स्वानंदी व समर यांच्यातील मैत्री, छोटी छोटी भांडणे, त्यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते. त्यामुळे मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसते.
याबरोबरच, अभिनेत्री अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. काही वेळा तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट लक्ष वेधून घेतात. तिचे फोटो, तिने लिहिलेल्या वेगवेगळ्या कॅप्शन्स याची बऱ्याचदा चर्चा रंगताना दिसते.
“माझ्या आयुष्यात जे चढ-उतार…”
आता नुकतीच तेजश्रीने झी २४ तासला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने विविध गोष्टींवर चर्चा केली, तिची मते व्यक्त केली. तेजश्री असेही म्हणाली की, माझ्या आयुष्यात जे चढ-उतार आले, त्या काळात माझे कुटुंब माझ्याबरोबर होते, हे मी अभिमानाने सांगू शकते. तुमचे कुटुंब तुमच्याबरोबर असेल, तर तुम्ही जगाशी लढू शकता. बाकी कोणाची गरज पडत नाही.
लग्नाच्या वयाबद्दल तेजश्री म्हणाली, “आताच्या काळात लोक लग्न करण्यास फार उत्सुक नाहीत. पण, मला असं वाटतं की, तुमची जेव्हा योग्य वेळ असेल आणि जेव्हा योग्य दिवस येईल तेव्हा ती योग्य व्यक्ती तुमच्यासमोर उभी राहील.”
तिशीच्या आधी लग्न करावे की तिशीच्या नंतर लग्न करावे, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, “हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. आजच्या काळात तर प्रत्येकासाठी करिअर हे प्राधान्य आहे. त्यामुळे क्वचित वेळा लोक तीसच्या आत लग्न करण्याचा विचार करत आहेत, असं मला वाटतं.”?
पुढे ती म्हणाली, “मला वैयक्तिक विचारशील, तर मला नेहमीच असं वाटतं की, तिशीच्या आधी लग्न केलं पाहिजे. म्हणून मी तेव्हा लग्न केलं होतं. ते जास्त काळ टिकू शकलं नाही, ही नंतरची गोष्ट आहे. पण, मला विचारलं, तर लग्न तिशीच्या आधी झालं पाहिजे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही तिशीच्या आधी स्वत:मध्ये काही बदल करू शकता. तुमचा स्वतंत्र प्रवास सुरू असतो, तुम्ही आयुष्यात पुढे जात असता. तिशीनंतर बदल स्वीकारणं किंवा स्वत:मध्ये करणं हे थोडं कठीण होऊ शकतं. त्यामुळे ते म्हणतात ना की, माती ओली आहे, तोपर्यंत त्याला आकार द्यावा, तसं ते आहे.”
आताच्या काळात घटस्फोटांची संख्या वाढत आहे आणि समाजाला ते स्वीकारणं कठीण जात आहे. यावर तुझं मत काय आहे? त्यावर तेजश्री म्हणाली, “मला वाटतं की, आताच्या काळात हे स्वीकारणं सोपं झालं आहे. मी ज्या काळात त्यातून गेले, तेव्हा थोडं कठीण असेल; पण उलट आजच्या काळात मला बरं वाटतंय की, आई-वडील त्यांच्या मुलींच्या, मुलांच्या बाजूने उभे राहतात. तुमचं कुटुंब तुमच्या बाजूने उभे असते, ही छान गोष्ट आहे. जग पुरोगामी होत आहे, प्रगती होत आहे ही चांगली गोष्ट आहे.”
दरम्यान, तेजश्री मालिकेबरोबर चित्रपटांतूनही प्रेक्षकांच्या भेटीला येते. तिने साकारलेल्या भूमिकांची वेळोवेळी चर्चा होताना दिसते. आता अभिनेत्री आगामी काळात कोणत्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
