मराठी मालिकाविश्वातील सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधानला ओळखलं जातं. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहेत. आजवर तिने छोट्या पडद्यावरच्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. सध्या तेजश्री प्रधान ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत स्वानंदीची मुख्य भूमिका साकारतेय. तेजश्रीने नुकताच २ जूनला तिचा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने तिच्यासाठी जवळच्या मित्रमंडळींनी खास पोस्ट शेअर केल्या होत्या.

‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेतील तेजश्रीची ऑनस्क्रीन नणंद अधिरा म्हणजेच अभिनेत्री पूर्णिमा डे हिने सुद्धा तेजश्रीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. मालिकेत अधिरा-स्वानंदीची भूमिका साकारणाऱ्या या दोघी ऑफस्क्रीन सुद्धा तेवढ्याच चांगल्या मैत्रिणी आहेत.

तेजश्री प्रधान लिहिते, “वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा तेजश्री…मी हसताना, रडताना, उगाचच वेगवेगळे विचार करताना तू नेहमी माझ्याबरोबर असशील याची मला खात्री आहे. माझ्या या सगळ्या गोष्टी तू आपुलकीने समजून घेतेस…खरंतर, तुझ्यामुळे माझं आयुष्य अधिक सुंदर झालं आहे. आयुष्यात तू जे काही डिझर्व्ह करतेस…त्या सगळ्या गोष्टी तुला मिळाव्यात अशी माझी मनापासून इच्छा आहे. तू कायम आनंदी राहा…तुला उत्तम आरोग्य लाभूदेत आणि तुला हसण्याची असंख्य कारणं मिळोत…त्या जोडीला हे खास गाणं ( तेजश्रीबरोबर फोटो शेअर करत पूर्णिमाने ‘भुल भुलैय्या’ चित्रपटातील ‘Ami Je Tomar’ हे गाणं लावलं आहे. या बंगाली गाण्याचा अर्थ ‘मी तुझीच आहे’ असा होतो )”

या पोस्टवर रिप्लाय देत तेजश्री म्हणते, “पुन्नू…तुलाही माहितीये की, माझ्या आयुष्यात तू किती महत्त्वाची आहेस”

दरम्यान, तेजश्री प्रधानसाठी तिची जवळची मैत्रीण शिवानी बावकरने सुद्धा खास पोस्ट लिहिली आहे. तेजश्रीच्या मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत सध्या अंशुमनचं बिंग फुटल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. चिंगी गरोदर असल्याचं सत्य स्वानंदी सर्वांसमोर उघड करते. यामुळे अंशुमन, मल्लिका सगळेच तोंडावर पडतात. स्वानंदी अंशुमनला सणसणीत कानाखाली मारते आणि आता राजवाडे सुद्धा बायकोची खंबीर साथ देणार आहेत. ही मालिका रोज सायंकाळी ७:१५ वाजता प्रसारित केली जाते.