‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील स्वाती व तिचा नवरा कार्तिकवर ओढावलेलं संकट अखेर दूर झालं आहे. सगळ्यांच्या नकळत मुक्ता स्वातीला करत असलेली मदत कोळी, गोखले कुटुंबासमोर येते. यामुळे सागरही मुक्ताला घराबाहेर काढण्यापासून इंद्राला रोखतो. पण खऱ्या अर्थाने सागरचे डोळे उघडतात. मुक्ताने कोळी कुटुंबाची लाज राखण्यासाठी जे काही केलंय त्यासाठी तो तिचे आभार मानतो. या सगळ्या नाट्यानंतर सागर मुक्तासाठी एक खास पदार्थ बनवताना दिसणार आहे.

‘प्रेमाची गोष्ट’च्या आजच्या भागात सागरचे वडील बापू झालेल्या सगळ्या घटनेमुळे मुक्ताला सोन्याची चैन काढून बक्षीस स्वरुपात देतात. पण मुक्ता घेण्यास नकार देते. मात्र बापू त्यांच्या आईने दिलेली चैन आशीर्वाद म्हणून तिला देतात. यावेळी इंद्रा बापूंना थांबवते. पण नंतर सागर घे म्हटल्यावर मुक्ता बापूंनी दिलेली चैन स्वीकारते.

हेही वाचा – Video: अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये जान्हवी कपूरचा रिहानासह ‘झिंगाट’ गाण्यावर डान्स, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

दुसऱ्या बाजूला सावनी हर्षवर्धनकडे लग्नाचा तगादा लावून बसलेली असते. यामुळे हर्षवर्धन चिडतो. पण तितक्यात आदित्य येतो आणि यावेळी दोघं खोटं नाटक करतात. यादरम्यान हर्षवर्धनची डील सागरला मिळते. त्यामुळे त्याचा राग अनावर होतो. पण आदित्य समोर असल्यामुळे हर्षवर्धन डील कॅन्सल होण्याचं खापर सागरवर फोडतो. सागर त्याला त्रास देण्यासाठी डील घेत असल्याचं आदित्यला सांगतो. यामुळे आदित्यच्या मनात सागरविषयी आणखी राग निर्माण होतो.

तर कोळींच्या घरात मुक्ता-सागरचं प्रेम फुलत असतं. सई मुक्ता-सागरला जवळ आणण्यासाठी प्रयत्न करत असते. अशातच सागर विश्वासाने जोडलेल्या मुक्ताबरोबरच्या नात्यात वेगळं काहीतरी करू पाहत असतो. तो मुक्ताच्या आईला विचारून तिच्या आवडीच्या पुरणपोळ्या बनवण्याचा घाट घालतो. मुक्ताला हे पाहून फार आनंद होतो. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

हेही वाचा – महेश मांजरेकरांना वाटतं ‘हे’ असावं स्वतःच्या जीवनपटाचं नाव, म्हणाले…

दरम्यान, तेजश्री प्रधान व राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसत आहे. मुक्ता व सागरची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. त्यामुळेच मालिका टीआरपीच्या यादीत सुरुवातीपासून अव्वल स्थानावर पाहायला मिळत आहे.