Veen Doghantali Hi Tutena : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. नुकतीच या मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. समर-स्वानंदीच्या आयुष्यात आता किमया आलीये. या किमयाची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री पूर्वा गोखले साकारणार आहे. ‘कुलवधू’ मालिकेच्या यशानंतर अनेक वर्षांनी सुबोध भावे आणि पूर्वा गोखले यांची जोडी एकत्र झळकणार असल्याने सध्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अशातच, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेच्या सेटवरून आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेच्या टीमने एकत्र येऊन नुकतंच एका खास व्यक्तीचं केळवण साजरं केलं आहे. आता ही खास व्यक्ती आहे, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेचे निर्माते हेमंत सोनावणे. ते लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. यानिमित्ताने मालिकेतील कलाकार आणि संपूर्ण प्रोडक्शन टीमने मिळून त्यांच्यासाठी खास केळवणाचा बेत केला होता. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेतील सगळ्या महिला कलाकारांनी सुरुवातीला हेमंत यांचं औक्षण केलं. यानंतर निर्मात्यांनी सुंदर असा उखाणा सुद्धा घेतला. मालिकेच्या संपूर्ण टीमने मिळून हेमंत यांना खास गिफ्ट दिल्याचं देखील या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हेमंत यांच्या केळवणासाठी खास तयारी करण्यात आली होती. केळीच्या पानावर सुंदर सजावट करून ‘केळवण’ असं लिहिण्यात आलं होतं. याशिवाय जेवणाच्या ताटाच्या बाजूला देखील फुलांची सजावट केली होती.
मालिकाविश्वातील कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत निर्माते हेमंत सोनावणे यांना आयुष्यातील नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
स्वानंदी ( तेजश्री प्रधान ), समर राजवाडे ( सुबोध भावे ), आजी नलिनी राजवाडे, मल्लिका, रोहन, स्वानंदीचे बाबा दिलीप, अंशुमन राजवाडे असे मालिकेतील सगळे कलाकार या ‘केळवण’ समारंभाला उपस्थित होते. यावरून या सगळ्या कलाकारांमध्ये ऑफस्क्रीन किती सुंदर बॉण्डिंग आहे हे पाहायला मिळतं.
दरम्यान, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका सध्या सायंकाळी ७:१५ वाजता प्रसारित केली जाते. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका ४५ मिनिटं प्रसारित केली जात आहे.
