Veen Doghantali Hi Tutena Fame Actress Tejashri Pradhan & Purniemaa Dey : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेतील सगळेच कलाकार आता घराघरांत लोकप्रिय झाले आहेत. समर-स्वानंदी, अधिरा-रोहन या कलाकारांचा एक वेगळा चाहतावर्ग तयार झाला आहे. अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. यामधील कलाकारांचं ऑफस्क्रीन बॉण्डिंग सुद्धा तेवढंच छान आहे. ‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये अधिराची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री पूर्णिमा डेने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने मालिकेतील सहकलाकारांनी तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केल्या आहेत.

‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत तेजश्री स्वानंदीची तर, पूर्णिमा डे अधिरा ही भूमिका साकारत आहे. मालिकेत या दोघीही एकमेकींच्या नणंद-भावजय आहेत. स्वानंदी नेहमीच अधिराला पाठिंबा देताना दिसते. या दोघींचं ऑनस्क्रीन बॉण्डिंग छान आहेच पण, त्याचप्रमाणे खऱ्या आयुष्यात पूर्णिमा आणि तेजश्री प्रधान या दोघींची मैत्री सुद्धा तेवढीच खास आहे.

पूर्णिमाच्या वाढदिवसानिमित्त तेजश्री प्रधानने खास Reel व्हिडीओ शेअर केला आहे. पूर्णिमाचा वाढदिवस ९ ऑगस्टला असतो. पण, तेजश्रीने तिला एक दिवस उशीरा बर्थडे विश केलं आहे. त्यामुळे उशीरा विश केलंय म्हणून रागावू नकोस असं तेजश्रीने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

तेजश्री प्रधान पूर्णिमाला शुभेच्छा देत म्हणते, “उशीरा बर्थडे पोस्ट शेअर करतेय…प्लीज रागावू नकोस, मी याची नक्कीच भरपाई करेन” या व्हिडीओमध्ये तेजश्री-पूर्णिमाचं ऑफस्क्रीन बॉण्डिंग किती सुंदर आहे हे पाहायला मिळतंय.

तेजश्री-पूर्णिमाचं एकत्र वर्कआऊट करणं, त्यांचे जॉगिंग-व्यायाम करतानाचे फोटो या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. चाहत्यांनी सुद्धा पूर्णिमावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका ‘झी मराठी’वर सायंकाळी ७:३० वाजता प्रसारित केली जाते. यामध्ये तेजश्री प्रधान, पूर्णिमा डे यांच्यासह सुबोध भावे, किशोरी अंबिये, राज मोरे, भारती पाटील, हरीश थोरात या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.