Zee Marathi Awards : ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्याचा पहिला भाग ३१ ऑक्टोबरला टीव्हीवर प्रसारित करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा या सोहळ्यात ‘नॅचरल परफॉर्ममर ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्माने करण्यात आला. सध्या ‘झी मराठी’ वाहिनीच्या ‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेत त्या कृष्णाईची प्रमुख भूमिका साकारत आहेत.

निवेदिता सराफ यांना पुरस्कार जिंकताच मंचावर एक खास सरप्राइज देण्यात आलं. ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत निवेदिता यांच्या ऑनस्क्रीन मुलीची भूमिका साकारणारी गौरी म्हणजेच त्यांची सहकलाकार ट्विंकल यादवने मंचावर एन्ट्री घेतली.

गौरीने लाडक्या कृष्णाईसाठी कवितेच्या चार ओळी म्हटल्या…

तुझ्याविषयी बोलणं खरंच इतकं सोपं नाही…
आई म्हणू तुला की, म्हणू आणखी काही…
तुझ्याबरोबर काम करायचं स्वप्न आता सत्यात उतरलं
Reel मधलं नातं आता Real मध्ये घडलं!

यानंतर मंचावर एन्ट्री झाली प्रेक्षकांच्या लाडक्या तेजश्री प्रधानची. निवेदिता सराफ या तिला आपली लेकच मानतात, तेजश्री म्हणाली…

इतकं मोठं नाव तुझं, मी बोलू तरी काय?
आकाशाला हात तुझे पण, जमिनीवर पाय
तुझ्यासाठी एक गोष्ट आज मी करतेच
आई म्हणते, ते वाक्य मुलगी म्हणून सांगते…
अशीच हसत राहा, ना दृष्ट कोणाची लागो
आमच्या वाट्याचं आयुष्य आई तुला लागो
तुझ्याविषयी बोलणं खरंच इतकं सोपं नाही…
सर्वांना तोऱ्यात सांगतो आम्ही…ही आमची सुपरस्टार आई!

ट्विंकल ( गौरी ) आणि तेजश्री ( स्वानंदी ) यांचं हे गोड सरप्राइज पाहून सगळेच भावुक झाले होते. दरम्यान, निवेदिता यांच्याप्रमाणे तेजश्री आणि ट्विंकल यांनाही अन्य काही पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.