Tejashri Pradhan : मराठी मालिकाविश्वातील सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधानला ओळखलं जातं. २०१३ मध्ये तेजश्रीच्या ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं होतं. आज जवळपास १३ वर्षांनंतरही तेजश्रीची ही लोकप्रियता कायम आहे. तिच्या ‘अग्गंबाई सासूबाई’, ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिका सुद्धा प्रचंड गाजल्या. यासह सध्या सुरू असलेल्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेला सुद्धा प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतंय. एकंदर टेलिव्हिजनच्या या प्रवासाबद्दल तेजश्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
तेजश्री प्रधान ‘सिनेतडका २.०’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “मी असं कायम ऐकत आलीये की, जे माध्यम आपल्याला बोलावतं त्या माध्यमाकडे कधीच पाठ फिरवायची नाही आणि टेलिव्हिजन हे माध्यम असं आहे की, जे मला सातत्याने बोलवत राहतं. त्यामुळे माझ्या आयुष्यात टीव्ही माध्यमाचं एक वेगळं स्थान आणि एक वेगळं महत्त्व आहे. अर्थात यामध्ये आपल्याला सर्वात जास्त श्रेय प्रेक्षकांना द्यावं लागेल. कारण, प्रेक्षक माझ्यावर आजही तेवढंच प्रेम करतात.”
“एखादी मालिका संपल्यावर प्रेक्षक मला आपुलकीने विचारतात, तुम्ही पुन्हा कमबॅक केव्हा करणार? तेव्हा मग असं वाटतं, मी महाराष्ट्राला Answerable आहे..त्यामुळे मला पुन्हा एकदा टेलिव्हिजन केलं पाहिजे. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच मी सातत्याने नवनवीन काम करतेय.”
कधीच एकटं वाटत नाही, कारण…
“मला कधीच एकटं वाटत नाही कारण, या टीव्ही माध्यमाची जादू एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की, तू रिक्षाने फिर, बस-रेल्वे…चहाच्या टपरीपासून ते सेव्हन स्टार हॉटेलमध्ये जा, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे टेलिव्हिजनवर काम करणाऱ्या कलाकाराला ओळखलं जातं.”
‘त्या’ तणावात मी कधीच नसते!
“एक शो झाला की, आपण चार महिन्यांचा ब्रेक घेऊयात…यादरम्यान आपल्या पुढे कुणी जाईल का? आपल्याकडे संधी येतील की, नाही? या तणावात मी कधीच नसते. माझं ठरलंय की, हा एवढा-एवढा वेळ कुटुंबासाठी, मग स्वत:साठी किंवा करिअरसाठी वेगळा वेळ…या वेळांच्या गणिताकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे…याकडे माझा फोकस असतो.” असं तेजश्रीने सांगितलं.
