मराठी मनोरंजनसृष्टीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री तसेच तेजस्विनी पंडितच्या आई ज्योती चांदेकर यांचं गेल्यावर्षी १६ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झालं. तेव्हा छोट्या पडद्यावरील ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेत त्या पूर्णा आजीची महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होत्या. ज्योती चांदेकर यांच्या निधनाची बातमी समोर येताच संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला होता, त्यांचे तमाम चाहतेही हळहळले होते. आजही ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर ज्योती ताईंना क्षणोक्षणी मिस केलं जातं. प्रत्येक कलाकार त्यांची आठवण काढतात.
आईच्या निधनामुळे तेजस्विनीच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. आज ज्योती चांदेकर यांचा स्मृतीदिन आहे. तेजस्विनीने आईच्या आठवणीत इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तिने आईचा डायरी वाचनाचा एक सुंदर आठवणीतला फोटो शेअर केला आहे.
तेजस्विनी लिहिते, “आई…१ वर्ष झालं! तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये…I Am Sorry, तुला थँक्यू म्हणता आलं नाही…”
याशिवाय प्राजक्ता कुलकर्णी ज्योती चांदेकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करत लिहितात, “ज्योती ताई तुझ्यासोबत जेव्हा-जेव्हा काम केलंय, तेव्हा प्रत्येक वेळेचा अनुभव अविस्मरणीय आहे, तू उत्तम कलाकार तर होतीसच पण माणूस म्हणून सुद्धा अगदी दिलखुलास होतीस, तू जिथे असशील तिथे सुद्धा सगळ्यांची मनं जिंकून घेत असशील, तुझ्या आठवणी कायम स्मरणात राहतील … Love you”
ज्योती चांदेकर आणि तेजस्विनी पंडित या मायलेकींनी ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटादरम्यान एकत्र काम केलं होतं. “आईने इंडस्ट्रीत ५० वर्षांहून अधिक काळ काम केलं. नाटकापासून तिचा प्रवास झाला होता. नाटक, सिनेमा आता मालिका सगळ्या माध्यमांमध्ये तिने मनापासून काम केलं होतं. आईने ज्या-ज्या माध्यमांमध्ये काम केलं त्या-त्या वर्षीचे सगळे पुरस्कार घरात असायचे. तिच्या पोटी जन्माला येणं हे मी माझं अहोभाग्य समजते. तिचं हे कार्य मी पुढे नेण्याचा प्रयत्न करेन.” असं तेजस्विनी पंडितने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

दरम्यान, ज्योती चांदेकर यांच्या दीर्घ आणि उल्लेखनीय कारकिर्दीसाठी त्यांना प्रतिष्ठेचा बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. ‘मी सिंधुताई सपकाळ’ या सिनेमासह त्यांनी ‘गुरू’, ‘ढोलकी’, ‘तिचा उंबरठा’, ‘पाऊलवाट’, ‘सलाम’, ‘सांजपर्व’ अशा अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण साकारल्या आहेत. याशिवाय छोट्या पडद्यावरील ‘तू सौभाग्यवती हो’, ‘छत्रीवाली’ या मालिकांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
