Marathi Actress On Thane Gaymukh Ghat Accident : ठाणेमधील घोडबंदर येथील गायमुख घाटात आज शुक्रवार, (९ जानेवारी) एक विचित्र अपघात घडला. शुक्रवारी सकाळी या मार्गावर तब्बल १४ वाहनांची एकमेकांशी धडक झाली. यामुळे भीषण अपघात झाला. याच अपघाताबद्दल मराठी अभिनेत्रीनं पोस्ट शेअर केली आहे.
ठाणे-घोडबंदर रोडची स्थिती इतकी वाईट आहे की, या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सामान्य नागरिकच नव्हे, तर अनेक सेलिब्रिटीसुद्धा वैतागले आहेत. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत अनेक मराठी कलाकारांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. अशातच आज झालेल्या अपघाताबद्दलची पोस्ट मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवेनं शेअर केली आहे.
ऋतुजा बागवे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत असते. तसंच कामानिमित्तची माहितीसुद्धा शेअर करीत असते. अशातच तिनं आजच्या ठाणे-घोडबंदर येथील गायमुख घाटात झालेल्या अपघाताचा व्हिडीओ शेअर केला आहे.
ऋतुजानं शेअर केलेल्या या व्हिडीओमधून अपघाताची भीषणता लक्षात येत आहे. घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने अवजड वाहने वाहतुक करत होते. त्याचवेळी काही हलकी वाहने या मार्गावरून विरुद्ध दिशेने वाहतुक करत होते. नियंत्रण सुटल्याने ही वाहने एकमेकांना आदळली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अभिनेत्रीनं या अपघाताचं खरं कारण स्पष्टपणे सांगितलं आहे.
ऋतुजानं इन्स्टाग्राम स्टोरीवर अपघाताचा व्हिडीओ शेअर करीत स्पष्टपणे असं म्हटलं की, “विरुद्ध दिशेला गाडी टाकल्यामुळे अपघात झाला, असं म्हणून सरकारने कृपया हात झटकू नये.” तसंच यापुढे तिनं अपघाताचं खरं कारण ‘रस्त्याची दुरवस्था’, ‘कायम ट्रॅफिक’ आणि ‘ट्रॅफिक पोलिस नसणे’, तसंच ‘सरकारचं दुर्लक्ष’ असल्याचं सांगितलं आहे.
ऋतुजा बागवेने शेअर केला घोडबंदरमधील अपघाताचा व्हिडीओ
दरम्यान, या अपघातात अनेकजण किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती पोलीस, वाहतुक शाखा, आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाल्यानंतर पथके घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चार जखमींना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले.
तसंच घोडबंदर मार्गावरील या अपघातामुळे गायमुख ते वसई खाडी पूलापर्यंत वाहतुक कोंडी झालीआहे. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करण्याचे पथकांकडून सुरु आहे. रस्त्यावर वाहनांच्या काचा, वाहनांचे भाग रस्त्यावर तुटून पडले आहेत. त्यामुळे नागरिकांनी येथील प्रवास टाळावा, असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे.
