Tharala Tar Mag Updates : ‘ठरलं तर मग’ मालिका गेल्या काही महिन्यांपासून दररोज ४५ मिनिटं प्रसारित केली जात आहे. कोणतीही दैनंदिन मालिका दररोज पाऊण तास प्रसारित करणं ही मोठी गोष्ट आहे. कारण, यासाठी मालिकेतील कलाकारांसह संपूर्ण टीमला खूप मेहनत घ्यावी लागते. ‘ठरलं तर मग’ मालिकेत अशी एक अभिनेत्री आहे, जी गेली साडेतीन वर्षे दुहेरी जबाबदारी सांभाळताना दिसतेय. त्या म्हणजे प्रतिमा आत्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शिल्पा नवलकर. त्या मालिकेत प्रतिमाची भूमिका साकारत आहेत आणि त्याचबरोबर शिल्पा ‘ठरलं तर मग’च्या संवाद लेखिका सुद्धा आहेत. या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना तारेवरची कसरत होते का याबद्दल अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
शिल्पा नवलकर ‘अल्ट्रा बझ मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या, “सगळे कलाकार, तंत्रज्ञ आणि सेटवरची माणसं या ४५ मिनिटांच्या एपिसोडसाठी खूप मेहनत घेत आहेत. पण, मी सगळ्यात जास्त दमते असं मी नाही म्हणणार कारण…मान्य आहे मी खूप तास काम करते पण, शेवटी ते काम मी माझ्या बेडरुममध्ये बसून, लॅपटॉपवर माझ्या सोयीने करते. आता मी या मालिकेसाठी पहिल्यापासून कॅमेऱ्यापुढेही काम करतेय आणि संवाद लेखिका म्हणून पडद्यामागेही काम करते. सध्या आमच्या मालिकेचा एपिसोड पाऊण तास दाखवला जातो. ज्याचं शूटिंग सर्वांसाठी कठीण आहे…हे सगळेजण खूप थकतात. पण, तेवढंच सगळेजण एन्जॉय सुद्धा करतात.”
१३ नायिका सध्या प्रियाला धडा शिकवण्यासाठी एकत्र आल्या आहेत. अशा परिस्थितीत त्या १३ नायिकांच्या भूमिकांना धरून संवाद लिहायचे असतात, याविषयी बोलताना शिल्पा नवलकर म्हणाल्या, “आता वाहिनीवर जेवढ्या मालिका सुरू आहेत यातील… प्रत्येक नायिकेचा बोलण्याचा लहेजा, बोलीभाषा वेगळी आहे. उदाहरणार्थ, कृष्णा…ही गावातील भूमिका आहे तर, त्यानुसार कृष्णा ‘म्या गेलो…’ वगैरे असं म्हणते. तर आता मी कृष्णाचे संवाद लिहिण्यासाठी तिच्या मालिकेचे काही भाग काढून पाहिले.”
“आता ऊर्जा ( वचन दिले तू मला ) ही वकील आहे…आमच्या मालिकेतही वकील आहेत पण, ऊर्जा कशा पद्धतीने तिचं पात्र सादर करते या सगळ्या गोष्टींकडे फार बारकाईने लक्ष द्यावं लागतं. प्रत्येकवेळी असा अभ्यास करावा लागतो आणि त्याप्रमाणे सीन्स लिहावे लागतात. या सगळ्यात फार वेळ जातो…पण, लिहिताना खूप छानही वाटतं कारण, मला त्या-त्या पात्रांची ओळख होते, त्या नायिकांच्या मालिकेतील बोलीभाषा वापरता येतात. ही मजा वेगळीच आहे.” अशा भावना शिल्पा नवलकर यांनी व्यक्त केल्या.
