Tharala Tar Mag Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात सायलीने प्रियाला चांगलाच धडा शिकवल्याचं पाहायला मिळालं. प्रिया रोज अश्विनची फसवणूक करून महिपत-नागराजला भेटायला जायची. यावेळी ती…’मी मैत्रिणीकडे जातेय, मी पार्टीला जातेय’ अशी कारणं अश्विनसह सुभेदार कुटुंबीयांना देत होती. पण, प्रियाच्या हालचाली पाहून अर्जुन-सायलीला तिच्यावर संशय आला होता.
म्हणूनच, या दोघांनी प्रिया नेमकी कुठे जातेय याचा शोध घेतला आणि ती खोटं बोलून घराबाहेर पडत असल्याचं सत्य आता उघड झालं आहे. यामुळे अश्विन प्रियावर प्रचंड संतापतो. एकीकडे प्रियाची पोलखोल झालेली आहे पण, आता मालिकेत लवकरच आणखी एक ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
आता प्रिया पाठोपाठ अस्मिताच्या नवऱ्याची पोलखोल सुद्धा होणार आहे. अस्मिताचा नवरा सचिन आणि साक्षी शिखरेचं अफेअर असतं. साक्षी आपली ओळख आणि लूक बदलून समाजात वावरत असते. ती अगदी हुशारीने सचिनला आपल्या जाळ्यात ओढते. अस्मिताशी लग्न होऊन सुद्धा सचिन साक्षीच्या प्रेमात आंधळा झालेला आहे.
मध्यंतरी एका भागात अस्मिताने सचिनला कॅफेमध्ये एका वेगळ्याच मुलीबरोबर पाहिलं असं दाखवण्यात आलं होतं. पण, यानंतर सचिन मोठ्या हुशारीने आपला खोटेपणा लपवतो. अस्मिता आणि सचिन या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाद होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता अर्जुन सचिनला साक्षी शिखरेबरोबर रोमान्स करताना पाहणार आहे.
सचिन व साक्षी यांना रोमान्स करताना पाहून अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. अस्मिताचा संशय खरा होता याची जाणीवही त्याला होते. मात्र, अर्जुनला ती मुलगी साक्षी शिखरेच आहे हे समजेल का? तो तिला ओळखणार की नाही याबद्दल प्रोमोमध्ये अपडेट दिलेली नाही. फक्त पाठमोऱ्या बसलेल्या सचिनला अर्जुन दुसऱ्या मुलीसह रोमान्स करताना पाहतो असं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
अर्जुनला सचिनच्या अफेअरबाबत समजल्यावर तो खूप अस्वस्थ होतो. घरी जाऊन तो सर्वांसमोर म्हणतो, “मी माझ्या बायकोला सोडून इतर कोणत्याही मुलीकडे कधीच पाहत नाही. माझं कुटुंब माझी जबाबदारी आहे. माझ्या कुटुंबीयांकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं किंवा त्यांना दुखावण्याचा प्रयत्न केला तर मी त्या माणसाचा जीव घेईन”
अर्जुन अचानक हे सगळं का बोलतोय याचा विचार करून सायलीला सुद्धा आश्चर्य वाटतं. अस्मिता सुद्धा भावाचं बोलणं ऐकून विचारत पडते. आता या सगळ्यावर अर्जुन काय उपाय शोधणार? तो सचिनला सगळ्याचा जाब विचारेल का? सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती मुलगी साक्षी शिखरे असल्याचं अर्जुनला समजेल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चाहत्यांना मालिकेच्या आगामी भागात मिळतील.
