Tharala Tar Mag Serial : ‘ठरलं तर मग’ मालिकेला काही दिवसांपूर्वीच एक वेगळं वळण मिळालं. सायलीला आश्रमातील मुलींची तस्करी केल्याप्रकरणी डोहाळेजेवणाच्या दिवशीच अटक केली जाते. जेलमध्ये गेल्यावर तिचा सामना प्रियाशी होतो. “काहीही झालं तरी मी तुला जेलमधून सुखरुप बाहेर काढेन” असं वचन यावेळी अर्जुन सायलीला देतो. तिची तात्पुरती सुटका सुद्धा होते पण, आता अर्जुनसमोर मोठं आव्हान असतं बायकोला निर्दोष सिद्ध करून दाखवण्याचं…अर्जुन केसचा सखोल तपास करत प्रत्येक पुरावा शोधत असतो. मात्र, अलीकडेच प्रसारित झालेल्या भागात अर्जुनवर गुंडांनी हल्ला केल्याचं पाहायला मिळालं.
अर्जुनला चार-पाच गुंड मिळून मारहाण करतात, त्याच्यावर चाकू हल्ला केला जातो. आता या हल्ल्यातून अर्जुन सुखरुप वाचणार की त्याचा जीव जाणार? नेमकं मालिकेत काय घडणार याबाबत प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. पण, प्रेक्षकांचा लाडका अर्जुन कुठेही जात नाहीये…नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये अर्जुन शुद्धीवर आला असून, तो या केसचा तपास करण्यासाठी आता सायलीला मदत करणार आहे.
अर्जुन रुग्णालयात असल्याने गरोदर असलेली सायली केसचा तपास करण्यासाठी घराबाहेर निघते. अर्जुन तिला फोनवर मार्गदर्शन करत असतो. ती सगळा तपास करते आणि आता एका वेगळ्या रुपात ती प्रेक्षकांसमोर येणार आहे.
मिसेस सायली सुभेदार आता अर्जुनच्या अनुपस्थितीत स्वत:ची केस स्वत: लढणार आहे. कोर्टात सगळे पुरावे घेऊन ती पोहोचते आणि माझी केस मी स्वत: लढणार असं सर्वांसमोर जाहीर करते.
प्रेक्षकही हा प्रोमो पाहून खूश झाले आहे. अर्जुनला नेमकं काय होणार याचे विचार प्रत्येकाच्या मनात सुरू होते. त्यामुळे नेटकरी या प्रोमोवर कमेंट्स करत म्हणतात, “कडक आणि धमाकेदार प्रोमो”, “हा फक्त ट्रेलर आहे…पिक्चर अभी बाकी है”, “वॉव सायली एका नव्या रुपात जबरदस्त”, “ठरलं तर मगचे सगळेच प्रोमो हल्ली भारी असतात…आम्ही मालिकाही दररोज पाहतो”, “एक नंबर प्रोमो अर्जुनला पाहून बरं वाटलं”, “अर्जुन जेव्हा कमबॅक करेल तेव्हा आता आणखी मजा येईल”, “अर्जुनला पाहून समाधान वाटलं” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा विशेष लवकरच भाग रात्री ८:३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित केला जाईल.
