Tharala Tar Mag Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून सायली-अर्जुनचं आयुष्य आधीपेक्षा पूर्णपणे बदलून गेल्याचं पाहायला मिळत आहे. प्रिया जेलमध्ये गेल्यावर सगळ्या गोष्टी नीट होतील, आता अर्जुन-सायली सुखाने संसार करतील असा सर्वांचा समज असतो. पण, प्रियाच्या कारस्थानामुळे सगळ्या गोष्टी बदलून जातात. अर्जुन-सायलीच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होते. ऐन डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमात पोलीस येऊन सायलीला अटक करतात. आश्रमातल्या मुलींची तस्करी केल्याचा आरोप तिच्यावर असतो.

प्रिया श्वेताला सुभेदारांच्या घरात राहायला पाठवून मोठा गेम खेळते. कुटुंबात भांडणं लावणं, गैरसमज निर्माण करणं, सायली-अर्जुनच्या छोट्या-छोट्या गोष्टींवर सतत लक्ष ठेवणं हा प्रियाचा मूळ हेतू असतो. श्वेताच्या माध्यमातून प्रियाला बरीच मदत मिळते, ती महिपतपर्यंत सुद्धा सगळी माहिती पोहोचवत असते. यामुळेच आता मालिकेत आणखी एक ट्विस्ट येणार आहे.

अर्जुन-सायलीच्या सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवून आता श्वेता प्रिया-महिपत गँगसह मोठा प्लॅन बनवणार आहे. पुरावा शोधणाऱ्या अर्जुनवर जीवघेणा हल्ला करण्यात येणार आहे. अर्जुनला प्रचंड मारहाण केल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, सायली घरात देवीआईची पूजा करत असते. अर्जुनवर चाकूने शेवटचा वार केला जातो ज्यामुळे तो कळवळून खाली पडतो आणि ‘बायको…’ अशी हाक मारून डोळे मिटतो.

अर्जुनबरोबर काहीतरी घडलंय याचे संकेत सायलीला सुद्धा मिळतात. तिच्या हातून पूजा करताना कुंकू सांडतं ज्यामुळे ती सुद्धा अस्वस्थ होते. अर्जुनवर ज्याप्रकारे हल्ला झालाय…त्यावरून अर्जुन मालिका सोडणार तर नाही ना अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत. मात्र, अर्जुन या मालिकेचा हिरो असल्याने तो या कठीण प्रसंगातून मार्ग काढून तो पुन्हा बरा होण्याच्या शक्यता जास्त आहेत. आता नेमकं काय घडणार हे मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

चाहत्यांनी या प्रोमोच्या कमेंट्समध्ये “अर्जुनला काही व्हायला नको..तो सुखरुप असायला हवा”, “अमितने मालिका सोडली का?”, “कृपया अर्जुनला काही होऊ देऊ नका आणि सायली-अर्जुनला एकत्रच दाखवा नाहीतर कोणीच हा कार्यक्रम बघणार नाही”, अमित सोडतोय का? अशा असंख्य प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, आता मालिकेत नेमकं काय घडणार हे २३ ऑगस्टच्या विशेष भागात स्पष्ट होईल. ‘ठरलं तर मग’ मालिका रात्री ८:३० वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित केली जाते.