Tharala Tar Mag Promo Updates : ‘ठरलं तर मग’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अर्जुन-सायलीने आपल्या भूमिकांची अदलाबदल केल्याचं पाहायला मिळत होतं. अर्जुनने संपूर्ण घराचा कारभार हाती घेतला होता तर, सायली चैतन्यच्या मदतीने ऑफिस सांभाळत होती. सायली-अर्जुनचा हा व्हॅलेंटाईन्स स्पेशल वीक प्रेक्षकांना खूपच भावला.
खरंतर, या सगळ्याची सुरुवात अर्जुन-सायलीमध्ये गोड भांडण होऊन झाली होती. अर्जुनला वाटायचं सायलीला घरात काहीच काम नसतं, तर दुसरीकडे आपला नवरा आपल्याला वेळच देत नाहीये असाच काहीसा समज सायलीला सुद्धा झाला होता. मात्र, जवळपास आठवडाभर एकमेकांच्या कामाची अदलाबदल केल्यावर या दोघांनाही आपल्या चुकांची जाणीव झालेली आहे.
सायली घर सांभाळून, घरातल्या सगळ्या माणसांची काळजी घेऊन आपल्याला खूप साथ देते… याची १०१ टक्के खात्री अर्जुनला पटली आहे. तर, सायलीला सुद्धा हे कळून चुकलंय की, दिवसभर अर्जुनला ऑफिसमध्ये प्रचंड काम असतं.
दोघांनीही एकमेकांची माफी मागितली..
अर्जुन म्हणाला, “मिसेस सायली माझं चुकलं… दिवसरात्र हे घर आणि या घरातल्या माणसांना तुम्ही एकत्र जोडून ठेवता.”
यावर सायली म्हणते, “अहो… मी पण तुमच्यावर किती चिडायचे… तुम्ही उशिरा येता, सतत मिटींग, फोन कॉल्स… पण, आता समजलं उंबरठ्याच्या आत घर नांदतं आणि उंबरठ्याबाहेर कर्तृत्व गाजतं.” पुढे अर्जुन बायकोला धीर देत म्हणतो, “एक बाजू सांभाळली तरच दुसरी बाजू बॅलन्स होते.”
आता दोघांनाही आपली चूक उमगल्यामुळे अर्जुन-सायली आता आपल्या मूळ जबाबदाऱ्या पुन्हा एकदा स्वीकारणार आहेत. सायली आता नेहमीप्रमाणे घर सांभाळेल. तर, अर्जुन आपल्या ऑफिसचा कारभार हातात घेईल. २० फेब्रुवारीला हा विशेष भाग प्रसारित केला जाईल.
‘ठरलं तर मग’ मालिकेच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी कमेंट्समध्ये… हा संपूर्ण व्हॅलेंटाईन्स स्पेशल आठवडा सिरियल पाहायला खूपच मजा आली असंही म्हटलं आहे. आता अर्जुन-सायली पुन्हा एकदा नागराजला कठोर शिक्षा कशी होईल याकडे लक्ष केंद्रीत करतील.
