‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला एक वर्ष पूर्ण होणार असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. अर्जुन आणि सायलीने मिळून मधुभाऊंची तुरुंगातून सुटका करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने लग्न केलेलं असतं. हा करार वर्षभरासाठी असतो त्यानंतर दोघेही आपआपल्या मार्गाने जाणार असं त्यांचं आधीच ठरलेलं असतं. अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य फक्त चैतन्य आणि कुसुम या दोघांनाच माहिती असतं. त्यामुळे आता ठरल्याप्रमाणे लग्नाला वर्ष झाल्यावर सायली आता सुभेदारांना सोडून जाणार की नाही? हे पाहण्यासाठी प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

सध्या मालिकेत अर्जुन-सायलीच्या लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट संपायला शेवटचे दोन दिवस बाकी राहिले आहेत. खरंतर, दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल प्रचंड प्रेम असल्याने आता पुढे काय करायचं असे विचार त्यांच्या डोक्यात सुरू असतात. अशातच सुभेदार कुटुंबीय त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी खास प्लॅनिंग करायचं ठरवतात.

हेही वाचा : Video : ‘मर्डर’ फेम मल्लिका शेरावतसमोर गौरव मोरेने केला बेली डान्स! अभिनेत्री झाली थक्क, म्हणाली…

सुभेदार कुटुंबीय लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अर्जुन-सायलीला सरप्राइज द्यायचं ठरवतात. घरच्यांनी केलेली तयारी पाहून अर्जुन-सायली आनंदी होतात. परंतु, हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्याचं दडपण त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत आहे. अशातच सेलिब्रेशनला सुरुवात करण्यापूर्वी अर्जुनचा धाकटा भाऊ अश्विन त्यांना “अरे केक कापण्याआधी मनात काहीतरी इच्छा मागा” असं सांगतो.

हेही वाचा : Video: “नातेवाईकांना पैसे दिले म्हणजे जबाबदारी घेतली असं होत नाही,” घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरून संतापला शशांक केतकर, म्हणाला…

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचा केक कापण्यापूर्वी अर्जुन-सायली मनात एकमेकांपेक्षा वेगळ्या इच्छा मागतात. सायली मनात म्हणते, “देवा ही माणसं आणि माझं पहिलं प्रेम विसरण्याची ताकद मला दे हीच माझी इच्छा आहे” तर, अर्जुन मनात म्हणतो, “काही केल्या मिसेस सायली माझ्या आयुष्यातून जाऊ नयेत माझी ही एवढी एकच इच्छा आहे.”

हेही वाचा : कंगना रणौतकडे ७ किलो सोनं, ६० किलो चांदी, आलिशान कार्स आणि बंगले, जाणून घ्या किती आहे संपत्ती?

आता सायली-अर्जुनपैकी नेमकी कोणाची इच्छा पूर्ण होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. आता अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं पुढे काय होणार? मधुभाऊ सुटणार का? या सगळ्या गोष्टींचा उलगडा लवकरच होणार आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा विशेष भाग येत्या १९ मे (रविवार) रोजी दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.