‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या सायली-अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपणार असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यावर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपवून दोघांनी वेगळं व्हायचं आणि त्यानंतर रितसर दोघांचाही कोर्टात घटस्फोट होईल असं अर्जुन-सायलीने आधीच ठरवलेलं असतं. परंतु, वर्षभरात दोघंही एकमेकांचे चांगले मित्र होतात त्यानंतर दोघांमध्येही हळहळू प्रेम बहरल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळालं. यामुळेच हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मोडणं अर्जुन-सायलीला जड जात आहे.

अर्जुन-सायली या दोघांनाही एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. परंतु, कॉन्ट्रॅक्ट आणि गैरसमज झाल्यामुळे दोघांनीही अद्याप एकमेकांना प्रेमाची कबुली दिलेली नाही. दुसरीकडे अर्जुन-सायलीच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार म्हणून सुभेदार कुटुंबीय आनंदी असतात. ते दोघांसाठी सरप्राइज प्लॅन करतात. यावेळी सायलीच्या मनात या सगळ्या लोकांची फसवणूक केल्यामुळे दडपण निर्माण होतं. तर, अर्जुन “मिसेस सायलींना माझ्यापासून कधीच वेगळं करू नकोस देवा” अशी इच्छा मागतो. अखेर अर्जुनची इच्छा आता पूर्ण होणार असून मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे. हा ट्विस्ट नेमका काय आहे जाणून घेऊयात…

हेही वाचा : बॉलीवूडमधील एकमेव मित्र म्हणजे सलमान खान; संजय लीला भन्साळींचा खुलासा, म्हणाले, “तो माझी काळजी घेतो…”

सायलीला घर सोडून जायला द्यायचं नाही यावर अर्जुन ठाम असतो. परंतु, अर्जुन बायकोला घर सोडून जाण्यापासून कसं अडवणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. एक पत्र लिहून सायली सुभेदारांचं घर सोडून जाते पण बायकोला अडवण्यासाठी अर्जुनने एक नवीन शक्कल लढवली आहे. हे नवीन कॉन्ट्रॅक्ट नेमकं काय आहे याचं उत्तर नव्या प्रोमोमधून समोर आलं आहे. अर्जुन सायलीला म्हणतो, “बायको मला तुला प्रपोज करायचंय…म्हणजेच मला माझी एक आयडिया तुझ्यासमोर प्रपोज करायचीये…आपलं कॉन्ट्रॅक्ट संपलं असलं तरीही केस जिंकेपर्यंत तुम्ही इथेच राहावं असं मला वाटतं.” यावर सायली “हो सर हे मला मान्य आहे” असं उत्तर त्याला देते.

हेही वाचा : “अरे हे कंचन…”, ४३ वर्षांपूर्वीच्या जुन्या गाण्यावर नारकर जोडप्याचा भन्नाट डान्स, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

हेही वाचा : लाडक्या आईसाठी परदेशातून आली मुलं; माधुरी दीक्षितने ‘असा’ साजरा केला वाढदिवस! डॉ. नेनेंनी शेअर केला Inside व्हिडीओ

सायलीने सुभेदारांकडे राहायला होकार दिल्यामुळे अर्जुनचा आनंद गगनात मावेनासा होतो. आता खरंच सायली सुभेदारांकडे राहणार की निघून जाणार? याचा उलगडा २२ मे रात्री ८.३० वाजता होणार आहे.