Tharala Tar Mag Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. २२ वर्षांपूर्वी प्रतिमा आत्या आणि रविराज किल्लेदारांचा जो अपघात झाला, त्यामागेही महिपत शिखरेचा हात असल्याचं सत्य आता सायली-अर्जुनसमोर उघड झालेलं आहे. मात्र, महिपतने हे सगळं नेमकं का घडवून आणलं? त्याचा किल्लेदारांशी आधीपासून काय संबंध होता हे अर्जुन-सायलीच्या लक्षात आलेलं नाहीये. त्यामुळे आता महिपतचं सत्य शोधून काढण्यासाठी मिस्टर अँड मिसेस सुभेदारांनी मिळून एक नवीन प्लॅन बनवला आहे.
प्रतिमा आणि सायली मंदिरात एकत्र जातात. यावेळी प्रतिमाला महिपताला पाहून चक्कर येते. यानंतर किल्लेदारांच्या घरी जाऊन सायली सगळा घटनाक्रम रविराज आणि अर्जुनला सांगते. यानंतर सायली पुन्हा एकदा प्रतिमा आत्याला महिपतचा फोटो दाखवते. नेहमीप्रमाणे महिपतला पाहून प्रतिमा घाबरते आणि सायलीला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं.
प्रतिमा आणि रविराज यांच्या अपघातामागे नक्कीच महिपत आहे याची खात्री अर्जुन-सायलीला पटते. पण, हे सत्य शोधून काढण्यासाठी आणि महिपतला गुन्हेगार सिद्ध करण्यासाठी त्यांना पुरावे गोळा करणं आवश्यक आहे. आता महिपत आणि किल्लेदारांचा एकमेकांशी नेमका काय संबंध होता इथपासून सगळी माहिती अर्जुनला गोळा करावी लागणार आहे. यामुळे हे दोघं एक प्लॅन बनवतात. ज्याठिकाणी अपघात घडवून आणला गेला त्याच जागेवर पुन्हा एकदा महिपतला बोलावून घेतात. २२ वर्षांपूर्वी ज्याठिकाणी अपघात झाला त्याच जागी महिपतला रंगेहाथ पकडायचं असा प्लॅन अर्जुन-सायलीने केलेला असतो.
अर्जुन महिपतला निनावी फोन करतो आणि म्हणतो, “२२ वर्षांपूर्वी पनवेल हायवेवर जो अपघात झालेला…तो नेमका कसा झाला होता याचा पुरावा तुला देतो. लोकेशन पाठवतोय लगेच ये.” महिपतला सुद्धा लगेच लोकेशनवर जाण्यासाठी निघतो आणि याच ठिकाणी बाबू ट्रक ड्रायव्हरचा फोटो एका बॅनरवर त्याला दिसतो. याच ट्रक ड्रायव्हरने रविराज किल्लेदारांच्या गाडीला धडक दिलेली असते. तो फोटो पाहून महिपतची बोबडी वळते, तो लगेच त्याला ओळखतो आणि इथेच अर्जुनची १०० टक्के खात्री पटते की, रविराज-प्रतिमाच्या अपघाताशी महिपतचा खूप जवळचा संबंध आहे. महिपतचं अपघाताशी असलेलं नेमकं कनेक्शन काय आहे? हे जाणून घेण्याचा दोघांचा प्लॅन यशस्वी होतो.
आता महिपत आणि किल्लेदारांचं २२ वर्षांपूर्वीचं कनेक्शन नेमकं काय आहे? याचा शोध मालिकेत अर्जुन-सायली घेणार आहेत. २८ आणि २९ नोव्हेंबरला रात्री ८:३० वाजता हा विशेष भाग प्रसारित केला जाणार आहे.
दरम्यान, आता रविराज-प्रतिमाच्या अपघाताचा शोध घेताना अर्जुन सायलीच्या खऱ्या भूतकाळापर्यंत पोहोचेल का? या सगळ्यात नागराज दोषी असल्याचं अर्जुन-सायलीला केव्हा समजणार? हे जाणून घेण्यासाठी आता प्रेक्षक आतुर झाले आहेत.
