Tharala Tar Mag Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत अर्जुन-सायली गेल्या काही दिवसांपासून नागराज विरोधात पुरावे शोधत असल्याचं पाहायला मिळालं होतं. २२ वर्षांपूर्वी घडलेल्या रविराज-प्रतिमाच्या अपघाताशी नागराजचा थेट संबंध असतो पण, योग्य पुरावे नसल्याने त्याला अजूनही शिक्षा झालेली नाहीये. सध्या या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी कोर्टात सुरू आहे. या केसमध्ये मुख्य साक्षीदार आहे महिपत. जर नागराजविरोधात महिपतने साक्ष दिली तर या केसला एक नवीन वळण मिळेल आणि नागराज तुरुंगात जाणार याची सर्वांना कल्पना असते. पण, महिपतला बोलतं करणं एवढं सोपं नसतं.
नागराजची केस सुरू असताना अर्जुनला साक्षी शिखरे जिवंत असल्याचा संशय येतो. आता यावरूनच तो भर कोर्टात महिपतला ब्लॅकमेल करणार आहे. नागराजचे वकील अर्जुनच्या प्रत्येक वक्तव्यावर ऑब्जेक्शन घेत असतात. शेवटी कोर्टात अर्जुन त्याचं शेवटचं शस्त्र बाहेर काढायचं असं ठरवतो.
खरंतर, अर्जुनकडे साक्षी शिखरेचे कोणतेही फोटो नसतात पण, तो महिपतला साक्षीचे सगळे फोटो मी कोर्टात सादर करेन असा इशारा देतो. आता लेकीला वाचवण्यासाठी महिपत याआधी सुद्धा कोणत्याही थराला जाऊ शकतो हे प्रेक्षकांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अर्जुनच्या ब्लॅकमेलिंगच्या डावामुळे ही संपूर्ण केस फिरते.
साक्षीचं सत्य कोर्टात सांगेन असा इशारा अर्जुन जेव्हा देतो…त्यानंतर महिपत कोर्टात पोपटासारखा खरं बोलू लागतो. आतापर्यंत केलेल्या सगळ्या गुन्ह्याची तो कबुली देतो.
याशिवाय, रविराज किल्लेदारांशी थेट संबंध नसून या सगळ्याची सुपारी नागराजने दिली होती असंही महिपत कोर्टात सांगतो. आता महिपतने गुन्हा मान्य केल्यामुळे आणि नागराजचं सत्य सर्वांसमोर सांगितल्यामुळे या दोघांनाही आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
केस जिंकल्यावर सगळेच अर्जुनचं कौतुक करत असतात. पण, यावेळी नागराज तुरुंगात जाता-जाता प्रियाला जीवे मारण्याची धमकी देतो. याशिवाय नागराज अर्जुनला सुद्धा एक मोठा अलर्ट देणार आहे. नागराज त्याला म्हणतो, “अर्जुन-सायली तुम्हाला काय वाटतंय मला तुरुंगात टाकून तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या फार मोठ्या सत्यापर्यंत पोहोचलात का? पण, हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे. तुमच्या डोळ्यासमोर एक सत्य लपलंय. मी ते सत्य सांगणार नाहीये…मी वाट बघणार तो खेळ रंगण्याची आणि तुमचं घर बिघडण्याची.”
आता अर्जुन-सायली खरी तन्वी नेमकी कोण? या सत्यापर्यंत पोहोचू शकतील की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याशिवाय अस्मिताचा नवराच साक्षी शिखरेचा बॉयफ्रेंड आहे हे सुद्धा अर्जुनला माहिती नाहीये. आता सचिनचं सत्य अर्जुन-सायलीला केव्हा कळणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

