‘स्टार प्रवाह’वरील ‘ठरलं तर मग’ आणि सोनी मराठीची ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकांचा सहाय्यक दिग्दर्शक गौरव काशिदे याचं अपघातात निधन झालं आहे. अभिनेत्री मनवा नाईक, जुई गडकरी यांनी भावुक पोस्ट शेअर करत याबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

जुई गडकरीने काही दिवसांपूर्वीच फेसबुक पोस्ट शेअर करत पावसाळ्यात गाड्या जपून चालवा असं आवाहन सर्व चाहत्यांना केलं होतं. यावेळी नुकत्याच आमच्या एका सहाय्यक दिग्दर्शकाचा अपघात झाला असून तो गेल्या आठ दिवसांपासून कोमात असल्याचं जुईने लिहिलं होतं. अखेर सहाय्यक दिग्दर्शक गौरव काशिदेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून त्याचं निधन झालं आहे. त्याच्या निधनानंतर छोट्या पडद्यावर शोककळा पसरली आहे. याबद्दल जुईने पोस्ट शेअर करत आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.

हेही वाचा : अक्षय कुमारच्या सिनेमांवर लावलेले पैसे बुडाले, रकुल प्रीतच्या सासऱ्यांनी २५० कोटींचे कर्ज फेडायला विकलं मुंबईतील ऑफिस

जुई गडकरीची भावुक पोस्ट

“ताई मला कोणी उठवलंच नाही, म्हणून लेट झाला यायला!” हे त्याचं पहिलं वाक्य होतं… आमचं युनिट जॉइन केल्यावर! पहिल्याच दिवशी लेट आला होता तो! मग रुळत गेला हळुहळू…

सीनचे que देताना जर ते character पळत आलेलं सेल तर तो पळून पण दाखवायचा.. हुशार होता… मला रोजचे सीन explain करायचा.. हसतमुख होता… मेहनती होता… त्या वयात मुलं असतात तसा अल्लड पण होता… मला थोडा घाबरायचा म्हणून “ताईसमोर स्मोक करुन गेलं की ताई लगेच ओळखते आणि ओरडते…त्यापेक्षा नाही करत स्मोक” असं म्हणून निदान तेवढ्यापुरतं तरी टाळायचा… गुणी मुलगा होता.

रात्री घरी जाताना आमच्या दुसऱ्या एका female AD ला आणि hair dresser ला घरी सोडून जायचा… त्या ही रात्री तो त्या दोघींना चारकोपला सोडून पुढे गेला… त्या दिवशी नेमकी आमची hair dresser चारकोपलाच उतरली… नाहीतर ती रोज त्याच्याबरोबर माहिमपर्यंत जायची… आणि तो तिला न्यायचं म्हणून गाडी सांभाळून चालवायचा…

त्याचा २४ वा वाढदिवस होता १० जूनला… ९ तारखेला त्याच्या बाईकचा वांद्रे येथे भीषण अपघात झाला… त्याच्या ब्रेनला जबरदस्त मार लागला होता… त्याला आमच्या सेटवर येऊन जेमतेम महिनाभरच झाला होता.. पण सगळ्यांशी त्याने छान नातं जोडलं होतं… गेले अनेक दिवस तो कोमामध्ये होता… आणि काल त्याची मृत्युशी असलेली झुंज अखेर संपली. सेटवर सगळे अजूनही सुन्न आहेत… सगळ्यांना वाटत होतं गौरव परत येईल…
गौरव, काल पण तुला कोणीतरी उठवायला हवं होतं रे… तू लेट आला असतास… पण, आला तरी असतास…
तुझ्या आतम्याला शांती मिळो हे तरी कसं लिहायचं?
त्या आई-बाबांचं आज काय झालं असेल याचा विचारही करु शकत नाही. देव त्यांना बळ देओ… गौरव काशिदे You Will Be Missed!

हेही वाचा : Video : सोनाक्षी सिन्हाला नववधूच्या रुपात पाहताच काजोलची होती ‘अशी’ प्रतिक्रिया, रिसेप्शन पार्टीत दोघीही झाल्या भावुक

दरम्यान, जुई गडकरीच्या या पोस्टवर असंख्य नेटकऱ्यांनी व ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केलं आहे.