Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना सायली विरुद्ध प्रिया असा ड्रामा पाहायला मिळत आहे. प्रियाची खरी ओळख बबली लोखंडे आहे हे सत्य आता अर्जुन-सायलीला समजलं आहे. पण, या दोघांकडे तिच्या विरोधात कोणतेही पुरावे नसतात. यामुळेच अर्जुन प्रियाला अधिराजच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतो. प्रिया आणि अधिराज एकमेकांना भेटतानाचा व्हिडीओ अर्जुनने आपल्या मोबाइलवर गुपचूप शूट करून ठेवला आहे.

सायली-अर्जुन प्रियाच्या भूतकाळाचा शोध घेत आहेत. यामुळेच तिला या दोघांचाही कायमचा बंदोबस्त करायचा असतो. प्रिया सायली-अर्जुनच्या गाडीचा अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न करते पण, त्यात तिला यश मिळत नाही. मात्र, तिचा दुसरा डाव यशस्वी होती. प्रियाच्या कारस्थानामुळे अर्जुनला अटक होते. तो जेलमध्ये गेल्यावर प्रिया पुन्हा एकदा सायलीवर दादागिरी करण्यास सुरुवात करते. पण, यावेळी सायली तिला रोखठोक उत्तरं देणार आहे. नायिकेसह एकूण १३ जणी मिळून प्रियाला चांगलाच धडा शिकवणार आहेत.

सायलीला या लढ्यात जानकी, नंदिनी, रमा, आनंदी, सखी, कृष्णा, ऊर्जा, काव्या, ईश्वरी, मंजिरी, नुपूर, गिरिजा या ‘स्टार प्रवाह’वरील अन्य मुख्य नायिकांची साथ लाभणार आहे. प्रिया सायलीला डिवचत विचारते, “तुझा नवरा गेला जेलमध्ये… आता तू एकटी काय करणार?”

यावर सायली म्हणते, “मी नाही… आम्ही सगळ्याजणी मिळून प्रिया तुला फोडणार, कापणार, प्रियाला घुसळणार, तिला पिळणार, किसणार, ठेचणार, सोलणार, मारणार, तुडवणार, झुरवणार, आपटणार, तोडणार…आम्ही १३ जणी मिळून प्रियाच्या पापाचा घडा कायमचा फोडणार. प्रियाचे तीन-तेरा वाजवणार” लवकरच हा भन्नाट सीक्वेन्स प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळेल.

या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. “प्रिया या सगळ्यांना पुरुन उरेल”, “एका खलनायिकेसाठी १३ जणी एकत्र आल्यात…याचा अर्थ प्रिया खरी नायिका आहे”, “याला म्हणतात महासंगम”, “सगळ्या नायिका एकत्र येऊन प्रियाला हरवणार.. तरीही प्रिया हरणार नाही”, “प्रियासाठी सगळ्या मालिकांच्या नायिका एकत्र आल्यात काय बोलावं”, “हे जरा जास्तच झालं” अशा अनेक प्रतिक्रिया प्रोमोवर नेटकऱ्यांकडून आल्या आहेत.

दरम्यान, आता सायली प्रियाला कशी अद्दल घडवणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्जुन जेलमधून कधी सुटणार हे पाहणं ‘ठरलं तर मग’ मालिकेत महत्त्वाचं ठरणार आहे.