Tharala Tar Mag Serial 8 July Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत नुकताच एक मोठा खुलासा झाला आहे. सुभेदारांची लाडकी सून सायलीच खरी तन्वी किल्लेदार आहे हे आता सर्वांसमोर उघड झालेलं आहे. सायलीला तिचा संपूर्ण भूतकाळ आता स्पष्टपणे आठवतोय. याशिवाय मधुभाऊ देखील शुद्धीवर आल्यामुळे सायलीला अखेर तिची खरी ओळख पटली आहे. यानिमित्ताने ‘स्टार प्रवाह’वर एक जंगी सेलिब्रेशन होणार आहे.

सायलीच खरी तन्वी आहे हे सर्वांना समजल्यावर तिच्यासाठी एका खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे आणि यासाठी ‘स्टार प्रवाह’च्या सगळ्या नायिका पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. सखी, नंदिनी, आनंदी, ईश्वरी, जानकी, नुपूर, कृष्णा आणि काव्या या सगळ्याजणी सायलीला सरप्राइज देण्यासाठी एकत्र आल्या आहेत.

या नायिका म्हणतात, “तारीख ठरलीये…वेळ पण फिक्स आहे कारण, अखेर आमच्या सायलीला तिची ओळख मिळालीये. एवढी मोठी आनंदाची गोष्ट मग सरप्राइज सुद्धा मोठंच हवं ना…म्हणून आमच्या सायली ताईसाठी खास सरप्राइज आहे. सायली नाही हा…आता तन्वी म्हणायचं!”

सायलीला आता ८ जुलैला काय सरप्राइज मिळणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. कारण, या पार्टीचं आमंत्रण संपूर्ण महाराष्ट्राला देण्यात आलं आहे. यादिवशी आणखी एक खास गोष्ट आहे ती कोणती जाणून घेऊयात…

सायलीची भूमिका या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी साकारत आहे. तुम्हाला माहितीये का जुईचं खऱ्या आयुष्यात ८ जुलै या तारखेशी खास कनेक्शन आहे. जुईचा वाढदिवस सुद्धा ८ जुलैलाच असतो आणि ‘ठरलं तर मग’च्या विशेष भागाचं प्रसारण सुद्धा ८ जुलैलाच करण्यात येणार आहे. त्यामुळे पडद्यावर भूमिका साकारणारी सायली आणि खऱ्या आयुष्यात जुई…या दोघींसाठी हा दिवस खास असणार आहे.

सायलीचं सरप्राइज आणि खऱ्या आयुष्यात जुईचा वाढदिवस एकाच दिवशी असल्याने सध्या चाहत्यांमध्येही आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. आता स्टार प्रवाहच्या नायिकांच्या सोबतीने सुभेदार कुटुंबीय सायलीसाठी काय सरप्राइज प्लॅन करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.