Tharala Tar Mag Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत अखेर सर्वात मोठा ट्विस्ट येणार आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर मालिकेत आलेला आहे. ‘खरी तन्वी कोण?’ यावर मालिकेचं संपूर्ण कथानक आधारित आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रिया म्हणजेच बबली लोखंडे खोटी तन्वी होऊन सुभेदारांच्या घरात राहत होती. प्रिया सर्वांची फसवणूक करते पण, अखेरीस तिला अटक होते…त्यानंतर सायली खऱ्या तन्वीचा शोध घेऊ लागते.
सायलीला सुभेदारांच्या घरात अनेक भास होतात. तिच्या आणि प्रतिमा आत्याच्या बऱ्याच आवडीनिवडी अगदी सारख्याच असतात. तन्वीचा बालपणीचा आवाज, तिने काढलेली चित्रं या सगळ्याचा उलगडा हळुहळू सायलीसमोर झाला आणि तिला खरी तन्वी दुसरी-तिसरी कोणीही नसून ती स्वत: आहे याची खात्री पटली.
सायलीला स्वत:च्या भूतकाळाबाबत कोणतीच रिस्क घ्यायची नसते. तिचा संशय खोटाही ठरू शकतो त्यामुळेच, सायली तिच्या भूतकाळाबद्दल जाणून घेण्यासाठी मधुभाऊंच्या भेटीला जाते. मधुभाऊ नागराजने केलेल्या हल्ल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून कोमात आहेत.
सायली हतबल होऊन मधुभाऊंना विचारते, “मधुभाऊ तुमचा एक इशारा मला माझ्या कुटुंबापर्यंत पोहोचवू शकतो. सांगा ना मधुभाऊ…मीच खरी तन्वी आहे ना?” मधुभाऊ काहीच प्रतिसाद देत नाहीत हे पाहिल्यावर सायली निघून जात असते. पण, इतक्यात मधुभाऊंच्या धक्क्याने जवळ ठेवलेला पाण्याचा तांब्या खाली पडतो. यामुळे सायली पुन्हा माघारी वळते. ती परत एकदा मधुभाऊंना विचारते, “तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहात का मधुभाऊ? मीच खरी तन्वी आहे का?”
सायलीचा हा प्रश्न ऐकून मधुभाऊ डोळ्यांनीच ‘हो’ असा इशारा करतात. मधुभाऊंमुळे सायलीला अखेर तिची स्वत:ची खरी ओळख पटणार आहे. सत्य समजल्यावर सायलीचे डोळे पाणावतात. हा विशेष भाग १५ जून रात्री ८:३० वाजता प्रसारित केला जाईल.
दरम्यान, ‘ठरलं तर मग’चा हा विशेष भाग पाहण्यासाठी प्रेक्षकही आतुर झाले आहेत. या प्रोमोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “अखेर प्रतीक्षा संपली”, “हा एपिसोड सुपरहिट ठरेल”, “वॉव फायनली समजलं”, “आता फक्त १५ जूनची प्रतीक्षा”, “फायर एपिसोड फक्त यात काही ट्विस्ट नको” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर नेटकऱ्यांकडून आल्या आहेत.
