Tharala Tar Mag BTS Video : ‘ठरलं तर मग’ मालिका सुरू होऊन आता जवळपास साडेतीन वर्षे झाली आहेत. त्यामुळे यामधील सगळेच कलाकार आता घराघरांत लोकप्रिय झाले आहेत. एकत्र काम करून या कलाकारांचं ऑफस्क्रीन नातं सुद्धा तेवढंच घट्ट झालं आहे. काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांना मालिकेत एक भन्नाट सीन पाहायला मिळाला होता. हा सीन मालिकेची नायिका सायली आणि खलनायिका प्रिया यांच्यातला आहे.

सायलीला DNA टेस्ट करण्यासाठी प्रियाच्या केसांचं सँपल हवं असतं. त्यामुळे सायली मोठ्या हुशारीने एक प्लॅन करते. ती प्रियाबरोबर जाणूनबुजून जोरदार भांडण करते. या भांडणादरम्यान दोघीही एकमेकींना धक्का मारतात, एकमेकींच्या रागात झिंज्या उपटतात असं मालिकेत पाहायला मिळालं आहे. सुभेदार कुटुंबीय मध्यस्थी करून या दोघींची भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करतात. पण, याचा काहीच परिणाम होत नाही.

शेवटी सायलीचा डाव साध्य होतो. प्रियाचे केस खेचल्यामुळे तिला DNA टेस्टचं सँपल सहज मिळून जातं. आता प्रेक्षकांना हा सीन पाहताना निश्चितच मजा आली असणार…पण, हा धक्काबुक्कीचा सीन करताना सेटवर कसं वातावरण होतं याचा व्हिडीओ जुईने नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

सीन सुरू असताना सायली-प्रियाने अगदी व्यवस्थित शूटिंग केलं आणि हा टेक संपल्यावर सेटवर उपस्थित सगळेजण हसु लागले….या दोघींची भांडणं पाहून सेटवरचे सगळेजण हसत होते. कारण, ऑनस्क्रीन एकमेकींशी भांडणाऱ्या या अभिनेत्री ऑफस्क्रीन खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.

जुईने नुकतंच एक आस्क मी सेशन घेतलं. यावेळी तिला, “प्रियाबरोबरचा लेटेस्ट BTS व्हिडीओ शेअर कर” अशी विनंती चाहत्याने केली होती. यावेळी सायलीने या धक्काबुक्कीच्या सीनचा व्हिडीओ शेअर केला होता. सायली याच्या कॅप्शनमध्ये लिहिते, “हा सीन शूट करताना आम्ही खूप मजा केली”

दरम्यान, सायली-प्रियाची भूमिका साकारणाऱ्या जुई गडकरी आणि प्रियांका तेंडोलकर खऱ्या आयुष्यात एकमेकींच्या खूप छान मैत्रिणी आहेत. त्यामुळे ऑनस्क्रीन अशी भांडणं करताना त्यांनाही मजा येते. आता लवकरच ‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रियाचा खरा चेहरा सर्वांसमोर येणार आहे. यानंतर सुभेदार तिला कोणती शिक्षा देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.