Tharala Tar Mag Fame Actress : ‘ठरलं तर मग’ मालिका गेली तीन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अलीकडच्या काळात अनेक कलाकार एकाच वेळी दोन मालिकांमध्ये काम करताना दिसतात. ‘ठरलं तर मग’ मालिकेतील महिपत म्हणजेच अभिनेते मयुर खांडगे ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत सुद्धा झळकताना दिसत आहेत. याशिवाय प्रतिमाची भूमिका साकारणाऱ्या शिल्पा नवलकर यांनी देखील यापूर्वी ‘दुर्गा’ मालिकेत काम केलं होतं.
आता यांच्या पाठोपाठ ‘ठरलं तर मग’ मालिकेतील आणखी एक अभिनेत्री एका नव्या सिरियलमध्ये झळकणार आहे. सायलीची जिवलग मैत्रीण कुसुमताई गेल्या काही दिवसांपासून ‘ठरलं तर मग’मध्ये दिसत नाहीये. मधुभाऊ कोमात आहेत, याशिवाय आश्रम केसचा निकाल सुद्धा लागला आहे. त्यामुळे आता कुसुम आश्रमाकडे लक्ष देतेय असं मालिकेत पाहायला मिळालं. सध्या या सिरियलचं कथानक नागराजचा खरा चेहरा, त्याच्या विरोधातील पुरावे, सचिन-साक्षी या पात्रांभोवती फिरतंय. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून कुसुम ‘ठरलं तर मग’मध्ये दिसत नाहीये.
आता कुसुमची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा दानडे थेट नव्या मालिकेच्या प्रोमोमध्ये झळकताना दिसली आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर येत्या काही दिवसांत ‘मी जिंकून घेईन सारं’ ही नवीन मालिका सुरू होत आहे. यामध्ये दिशा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. तिच्या भूमिकेचं नाव बेबी आत्या असू शकतं.
कारण, छवी ( नायिका ) मागच्या गाडीतून बेबी आत्याबरोबर येतेय असं हिरो आपल्या आजीला सांगतो. यानंतर छवी गाडीत बसायला जाते. पण, आत्या दरवाजा बंद करून घेते आणि तिला म्हणते, “तुझी तिथे गरज नाहीये…आश्रित आहेस घर सांभाळ” या वाक्यावरून ‘ठरलं तर मग’मधील साधीभोळी कुसुम नव्या मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, ‘मी जिंकून घेईन सारं’ या मालिकेत दिशासह जान्हवी तांबट, भारती आचरेकर, अमित रेखी, अमृता फडके, संचित चौधरी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असतील. आता ही नवीन मालिका केव्हापासून सुरू होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दिशाने नव्या मालिकेत एन्ट्री घेतल्यावर ती पुन्हा ‘ठरलं तर मग’ सिरियलमध्ये झळकणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

