Jui Gadkari Stuck In Traffic : कलाकार मंडळी ही सोशल मीडियावर अनेकदा आपले फोटो-व्हिडीओ शेअर करीत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. त्याचबरोबर अनेकदा ते आजूबाजूच्या परिस्थितीबद्दलही आणि रोजच्या आयुष्यातील काही सामाजिक प्रश्नांवर व्यक्त होत असतात. अशीच रोजच्या आयुष्यातील सर्वांच्या त्रासाची गोष्ट म्हणजे वाहतूक कोंडी.

शहरांमधील वाहतूक कोंडी ही समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत चालली आहे. या वाहतूक कोंडीचा त्रास सामान्य जनतेसह अनेक कलाकारांनाही होत असतो. त्याबद्दल ही कलाकार मंडळी सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. वाहतूक कोंडीमुळे कामाच्या ठिकाणी वा शूटिंगसाठी पोहोचण्यास उशीर होतो.

अशाच वाहतूक कोंडीचा त्रास जुई गडकरीलाही झाला आहे आणि त्याबद्दल तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. जुई गडकरी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत असते. अशातच तिने ठाण्यामधील वाहतूक कोंडीबद्दल पोस्ट शेअर केली आहे.

जुई गडकरी इन्स्टाग्राम स्टोरी

जुईने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे, ज्यात ती असं म्हणते, “गेल्या ४५ मिनिटांपासून कासारवडवली सिग्नलवर ट्रॅफिकमध्ये अडकली आहे.” त्यानंतर तिने उपरोधिकपणे “शूटिंगचं लवकर पॅकअप होऊनही वाहतूक कोंडीमध्ये अडकण्याबद्दल छान वाटत आहे. आनंदी जीवनाच्या शुभेच्छा,” असं म्हटलं.

त्याशिवाय जुईनं इन्स्टाग्राम स्टोरीवर ठाणे ट्रॅफिकच्या इन्स्टाग्राम पेजला टॅग केलं आहे आणि “ठाण्याच्या वाहतूक व्यवस्थापनाबद्दल खूप आनंदी” असंही म्हटलं आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी जुईनं ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या दहिसर चेक नाक्यावरील भीषण वाहतूक कोंडीचाही व्हिडीओ शेअर केला होता. त्यावेळीही तिनं आपला संताप व्यक्त केला होता.

पूर्व द्रुतगती महामार्ग, घोडबंदर भागातून हजारो वाहनांची वाहतुक होते. गुरुवारी (३ जुलै) रात्री ७.३० वाजताच्या सुमारास आनंदनगर भागात अचानक वाहतुक विरुद्ध दिशेनं सुरू झाल्यानें आणि पावसामुळे वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीमुळे मुंबईहून ठाण्याच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवघ्या पाच ते दहा मिनिटांच्या अंतरांसाठी किमान अर्धा ते पाऊण तास लागत होता. याच वाहतूक कोंडीचा फटका जुईलाही बसला आणि म्हणूनच काम होऊनही घरी वाहतूक कोंडीमुळे लवकर जाता न आल्यानं तिनं उपरोधिक पोस्ट शेअर केली.