‘ठरलं तर मग’ मालिकेमुळे आता अभिनेता अमित भानुशालीला घराघरांत अर्जुन सुभेदार म्हणून ओळखलं जातं. या मालिकेतील अर्जुन-सायलीची जोडी सर्वांना खूप आवडते. पण, तुम्हाला अर्जुनच्या खऱ्या आयुष्यातील सायलीबद्दल माहितीये का? नुकतीच ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर अमितने आपल्या पत्नीसह उपस्थिती लावली होती. अमित भानुशालीच्या पत्नीचं नाव आहे श्रद्धा. अमित आणि श्रद्धाची लव्हस्टोरी नेमकी केव्हा सुरू झाली जाणून घेऊयात…
२०१४ मध्ये अमित आणि श्रद्धाची पहिली भेट झाली होती. या दोघांनी एकमेकांना सर्वात आधी डोंबिवली स्टेशनला पाहिलं होतं. श्रद्धाला अमितने ‘मन उधाण वाऱ्याचे’ मालिकेत काम केलंय हे माहीत होतं. पण, त्याचं खरं नाव वगैरे अशा कोणत्याच गोष्टी तिला माहिती नव्हत्या. पण, त्यानंतर श्रद्धाने सोशल मीडियावर बरीच शोधाशोध केली आणि त्याचं खरं नाव शोधून काढलं.
यानंतर तिने अमितला फेसबुकवर स्वत:हून रिक्वेस्ट पाठवून मेसेज केला होता. पुढे, मेसेजवर गप्पा मारताना दोघांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले आणि त्यांची पुढची भेट सुद्धा डोंबिवली स्थानकावर झाली होती.
अमितची बायको श्रद्धा याबद्दल सांगते, “मेसेजवर बोलणं झाल्यावर आम्ही ३-४ दिवसांनंतर भेटायचं ठरवलं. माझ्यासाठी तो दिवस खरंच खूपच अविस्मरणीय होता. कारण, मी पहिल्यांदाच कोणत्या तरी सेलिब्रिटीला भेटणार होते. जेव्हा अमितने हँडशेक करायला हात पुढे केला तेव्हा मी पूर्णपणे थंड पडले होते. पहिल्यांदा डेटवर गेल्यावर मला अमित काय खाईल वगैरे काहीच माहिती नव्हतं. तेव्हा तो एकदम सर्वसामान्य मुलासारखा माझ्याशी वागला. शूटच्या गोष्टी नाही, काही नाही. करिअरबद्दल त्याने सर्व विचारलं. तेव्हाच मला जाणवलं हाच माझ्यासाठी योग्य मुलगा आहे.”
अमित याबद्दल सांगताना म्हणाला, “आम्ही एकमेकांना प्रपोज वगैरे केलं नाही. १५ दिवसांच्या रिलेशनशिपनंतर मी थेट लग्नासाठीच विचारलं होतं. अर्थात लग्न आम्ही काही महिन्यांनी केलं. पण, १५ दिवसांतच मी लग्नाची मागणी घातली होती.”
रिक्षा स्टॅन्डजवळ प्रपोज केलं…
“डोंबिवलीमध्ये रिक्षा स्टॅन्डजवळून चालता चालता मला अमित एकदम म्हणाला, अगं श्रद्धा मी विचार करतोय आपण दोघांनी लग्न केलं पाहिजे. मी एकदम थांबले आणि त्याला विचारलं अरे तू खरंच लग्नासाठी विचारतोय? त्यावर तो म्हणाला, अगं उगाच इतर कुठे जाऊन खर्च करण्यापेक्षा इथेच विचारतो. तुझं जे काय उत्तर आहे ते सांग. तेव्हाच त्याने मला थेट लग्नासाठी विचारलं होतं.” असं श्रद्धाने सांगितलं.
अशाप्रकारे श्रद्धा आणि अमितच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली होती. पुढे काही दिवसांत अमित-श्रद्धा विवाहबंधनात अडकले. आता या जोडप्याला हृधान नावाचा गोंडस मुलगा देखील आहे.
