Jui Gadkari on bonding with Priyanka Tendolkar: ‘ठरलं तर मग’ ही लोकप्रिय मालिका आहे. २०२२ पासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक ट्विस्ट, प्रत्येक पात्र प्रेक्षकांचे लाडके आहे. मालिकेतील सायली व अर्जुन यांची केमिस्ट्री कायम लक्ष वेधून घेते. हे जोडपे प्रत्येक संकाटाला एकत्रितपणे सामोरे जातात. प्रिया त्यांना त्रास देण्यासाठी सतत काहीतरी कट कारस्थाने करत असते.
पडद्यावर सायली व प्रिया यांच्यात शत्रुत्व पाहायला मिळत असले तरी खऱ्या आयुष्यात त्यांच्यात उत्तम मैत्री आहे. जुई गडकरीने सायली ही भूमिका साकारली आहे आणि प्रियांका तेडोंलकरने प्रिया ही भूमिका साकारली आहे. आज मैत्री दिन आहे. यानिमित्ताने जुई व प्रियांका या त्यांच्या मैत्रीबद्दल बोलल्या आहेत. त्या नेमकं काय म्हणाल्या आहेत, याबद्दल जाणून घेऊ…
“आमच्या दोघींच्यात ईर्ष्या…”
जुई गडकरी व प्रियांका तेंडोलकर यांनी नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत जुई म्हणाली, “आम्ही दोघीही खूप स्पष्टवक्त्या आहोत आणि दोघीही तोंडावर बोलतो.”
प्रियांका म्हणाली, “मी जुईबरोबर कम्फर्टेबल झाले किंवा मला जुईचा कधी त्रास झाला नाही. कारण-आमच्या दोघींच्यात ईर्ष्या नाहीये. तिला का मिळतंय, मला का नाही असं आम्हा दोघीनाही वाटत नाही. तिच्या वाटचं तिला मिळतंय, माझ्या वाटचं मला मिळतंय.
जुई म्हणाली, “ठरलं तर मग या मालिकेतील सर्व मुली एकमेकांच्या चिअरलीडर आहेत असं मला कायम वाटतं. कोणीच कोणाबद्दल मागे काही बोलत नाही. आम्ही सगळ्याजणी एकत्र असतो. जे काही पटत नाही, ते तिथे बोलतो, भांडतो, त्यामुळे एक स्पष्टता राहते. प्रियांका पण तशीच आहे. “
जुई प्रियांकाबद्दल असेही म्हणाली, “माझं काही वाईट होत असेल तर ती मला सांगते. तो विश्वास निर्माण झाला आहे. माझं उद्या काही चुकलं तर ती मला सांगेल. तिचं चुकलं तर मी सांगेन आणि आम्हाला त्याचा राग येत नाही. सीनमध्ये जरी तिनं मला सांगितलं की अमुक अशा पद्धतीने सीन कर, तर तू मला का सांगतेस म्हणून मला त्याचा राग येणार नाही. आम्ही ते बदल लगेच करतो.”
पुढे प्रियांका म्हणाली, “मला असं वाटतं की, मैत्री काय फक्त कौतुक करण्यासाठी किंवा मजा करण्यासाठी नसते.” प्रियांकाच्या वक्तव्यावर सहमती दर्शवत जुई म्हणाली, “किंबहुना मैत्री ही कौतुक करण्यासाठी नसतेच.” त्यावर प्रियांका म्हणाली, “जर जुई प्रोफोशनल आयुष्यात किंवा पर्सनल आयुष्यात काही चुकीचं करत असेल आणि मी तिला सांगितलं नाही तर आमच्या मैत्रीचा काय उपयोग आहे?”
यावर जुई हसत म्हणाली, “ती माझ्याहून एका पिढीने लहान असली तरी ऐकते.” त्यावर प्रियांका म्हणाली, “कधी कधी समजुतदारपणा लवकर येतो.” दरम्यान, मालिकेत सध्या सायली तुरुंगात गेल्याचे पाहायला मिळत आहे. आता ठरलं तर मगमध्ये पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
