Tharala Tar Mag fame Jui Gadkari and Monika Dabade: ट्रॅफिकमुळे अनेकदा त्रास सहन करावा लागतो. सामान्यांसह अनेकदा कलाकारही यावर व्यक्त होत असतात. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, ते जिथून दररोज प्रवास करतात, त्याबद्दल ते व्यक्त होत असतात.

आता लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरीनेदेखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तिने ट्रॅफिकचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

“गेली साडेतीन वर्षं इथे रस्त्याचं…”

तिने लिहित, “आज न राहून हे रील पोस्ट करत आहे. गेली साडेतीन वर्षे मी मड आयलँड नावाचा एका अत्यंत वाईट एरियामध्ये शूट करतेय. हो हा एरिया वाईटच आहे. कारण- इथे कुठल्याच सुविधा नाहीत. तसा तर हा आयएनएस हमलाचा म्हणजे डिफेन्स एरिया आहे. तरीही इतकं दुर्लक्ष?

Award Banner

“गेली साडेतीन वर्षं इथे रस्त्याचं काम सुरूच आहे. टप्प्याटप्प्यानं सुरू आहे. आरामात सुरू आहे. रोज नवीन खड्डे, रोज नवीन त्रास. त्यात शनिवार-रविवारी इथे अक्सा बीचला खास जत्रा लागते, जी अक्षरश: ट्रॅफिकच्या बाबतीत जीवघेणी असते. जर रात्रीही इतकं ट्रॅफिक लागत असेल, तर माणसानं नक्की काय करावं? इथे एखादी मेडिकल इमर्जन्सी आली तर काय करायचं?”

“आधीच मुंबई, ठाण्यातलं ट्रॅफिक नियंत्रणाबाहेरचं आहे. अगदी सगळ्यात मोठ्या सिग्नलला काही ना काही खणलेलं आहे. हे सगळं पार करून मढला यायचं आणि ट्रॅफिकमध्ये अडकायचं. हा रोजचा दिनक्रम झालाय आणि आज अगदीच राहवलं नाही म्हणून हे पोस्ट करत आहे. माझ्या आधीही बऱ्याच कलाकारांनी अशा स्टोरी किड्स केल्यात; पण उपयोग शून्य पावसाळा तर अजून वाईट असतो. इथे मला एक कळत नाहीये की, १० किलोमीटरचा रस्ता करायला साडेतीन वर्षं लागतात? कशाचीच उत्तरं मिळत नाहीयेत ना की, काही सुधारणा दिसते. हा प्रवास खूप त्रास देणारा झाला आहे. मढमधून बाहेर पडायला कधी कधी दोन तास लागतात आणि त्यापुढे घरी जाण्याचा प्रवास सुरू होतो. आपल्याला हेच मिळणं अपेक्षित आहे का?”

“टॅक्स वेळेत भरा, सगळ्या गोष्टी नीट पाळा. कुठल्याही नियमांचं उल्लंघन न करूनही जर अशी व्यवस्था मिळत असेल, तर नक्की काय करायचं सामान्य माणसानं?”

“मला माहीत आहे की यावर मला अनेक लोक ट्रोल करतील; पण एकदा येऊन बघा इथे आणि मग कळेल की, परिस्थिती किती वाईट झाली आहे. त्यात एवढ्याशा रस्त्यावरून मोठे ट्रक, बस ही वाहनंदेखील ये-जा करतात. ट्रॅफिक जाम होणारच. यावर काय कधी उपाय मिळेल माहीत नाही. रस्त्याच्या कामांचा वेग कधी वाढेल ते माहीत नाही.”

पुढे तिने देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, नितीन गडकरी, सुनेत्रा पवार, श्रीकांत शिंदे यांना टॅग करत लिहिले की, प्लीज आम्हाला मदत करा. आम्हाला तुमची गरज आहे.”

मोनिका दबाडे म्हणाली…

जुईच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. ‘ठरलं तर मग’मधील तिची सहअभिनेत्री मोनिकानंदेखील कमेंट करीत तिचा अनुभव सांगितला आहे. तिने लिहिले, “माझं बाळ १० महिन्यांचं आहे. काल माझं पॅकअप १० वाजता झालं. मढ ते गोरेगाव ४५ मिनिटांचा रस्ता आहे. मला पोहचायला दोन तास लागतात. त्यावर गाडी थोडी फास्ट चालवणे हा पर्यायसुद्धा नाही. कारण- बाईकवर रिव्हर राफ्टिंगसारखं वाटतं. इतकी दयनीय अवस्था की रस्त्यात रडू येतं. कारण- माझ्या बाळापर्यंत लवकर पोहोचतासुद्धा येत नाही.

“ही परिस्थिती मुंबईसारख्या विकसित शहरात आहे. त्यावर खरंच काहीतरी उपाय नाही निघू शकत?”, असे म्हणत अभिनेत्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.