Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत जुई गडकरी आणि प्रियांका तेंडोलकर या दोन लोकप्रिय अभिनेत्री अनुक्रमे सायली-प्रियाची भूमिका साकारत आहेत. सायली मालिकेची नायिका आहे, तर प्रिया ‘ठरलं तर मग’ची खलनायिका आहे. मालिकेत या दोघीही कायम भांडताना दिसतात. पहिल्या दिवसापासून प्रिया नेहमी सायलीविरोधात कटकारस्थानं रचताना दिसते. पण, खऱ्या आयुष्यात परिस्थिती एकदम वेगळी आहे.
जुई आणि प्रियांका या दोघीही खऱ्या आयुष्यात एकमेकींच्या खूप छान मैत्रिणी आहे. यंदा ‘स्टार प्रवाह’ पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर सुद्धा या दोघींनी एकत्र एन्ट्री घेतली होती. यावेळी त्यांच्या ऑफस्क्रीन मैत्रीची झलक सर्वांनीच पाहिली.
नुकताच जुई गडकरीच्या आई नेत्रा यांनी प्रियांकासाठी सेटवर एक खास पदार्थ बनवून पाठवला होता. याचा फोटो प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला आहे. अभिनेत्री लिहिते, “कधी-कधी वाटतं मैत्रिणीपेक्षा… तिची आईच माझी जास्त चांगली मैत्रीण आहे. खूप-खूप थँक्यू नेत्रा गडकरी काकू…जुई तू माझ्यासाठी शेवटचं काय बनवून आणलं होतंस?”
प्रियांकासाठी जुईच्या आईने खास शेवयांची खीर बनवून पाठवल्याचं अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच आपल्या आवडीची खीर बनवून पाठवल्यामुळे प्रियाने जुईच्या आईचे आभार सुद्धा मानले आहेत.
जुई गडकरी ( सायली ) आणि प्रियांका तेंडोलकर ( प्रिया ) या दोघींमध्ये ७ वर्षांचं अंतर आहे. प्रियांका वयाने लहान असली तरीही प्रचंड समजूतदार मुलगी आहे, असं कायम जुई म्हणत असते.

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, आता अर्जुन-सायलीसमोर प्रिया ही खरी तन्वी नाहीये याबद्दलचा खुलासा झालेला आहे. पण, तरीही शेवटची शंकाही दूर व्हावी यासाठी सायली प्रिया आणि प्रतिमाची पुन्हा एकदा DNA टेस्ट करणार आहे. पण, ही गोष्ट प्रियाला समजते आणि ती ऐनवेळी सँपल बदलण्यासाठी डॉक्टरला पैसे देणार आहे. आता रिपोर्ट्स नेमके काय येणार? यात प्रियाचा खरा चेहरा उघड होईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
